गेले १० महिने विद्युत विभागात मसाला कुटतोय शेतकरी, कारण वाचून येईल संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 10:13 AM2022-06-06T10:13:35+5:302022-06-06T10:30:35+5:30
नुकतंच दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एका शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे, जो रोज मसाले कुटण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचतो.
आपल्या देशातूनही अनेकदा एकापेक्षा एक विचित्र घटना समोर येतात. नुकतंच दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एका शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे, जो रोज मसाले कुटण्यासाठी आणि फोन चार्ज करण्यासाठी वीज विभागाच्या कार्यालयात पोहोचतो (Farmer Grinds Masala in Electricity Office). तुम्हालाही ही घटना जाणून विचित्र वाटेल, पण वीज विभागाचं कार्यालय घराच्या जवळच असल्याने तो या कामांसाठी रोज तिथे पोहोचतो हे खरं आहे.
एम हनुमंतप्पा असं या व्यक्तीचं नाव असून तो कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील मंगोटे गावात राहतो. हनुमंतप्पा यांचं घर मंगलोर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड अर्थात MESCOM च्या कार्यालयाजवळ आहे. अशा परिस्थितीत, ते निर्भयपणे आपल्या घरातील मसाले मिक्सरवर कुटण्यासाठी तिथे जातात. एवढंच नाही तर हा शेतकरी आपल्या घरातील फोनही तिथे जाऊन चार्ज करतो.
तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल आणि विचित्रही वाटेल पण हनुमंतप्पासाठी हे सामान्य आहे. गेल्या १० महिन्यांपासून ते हेच काम करत आहेत. विशेष म्हणजे कार्यालयातील कोणालाही त्यांच्या या कामाची अडचण नाही. हनुमंतप्पा यांच्या घरी वीजपुरवठा असला तरी त्यांना फक्त ३-४ तास वीज मिळते. त्यांनी आपल्या भागातील विजेची समस्या विद्युत विभागापासून ते स्थानिक आमदारापर्यंत सांगितली मात्र कोणतीही मदत मिळाली नाही.
एके दिवशी त्यांनी MESCOM च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोनवर विचारलं की फोन चार्ज आणि मसाला दळणे यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी मी कुठे जायचं? संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने त्याला कार्यालयात जाऊन मसाले बारीक करण्यास सांगितलं. हनुमंतप्पा यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला.
MESCOM कार्यालयात उपस्थित असलेल्या १० कनिष्ठ कर्मचार्यांपैकी कोणीही त्यांना सरकारी कार्यालयांचा वैयक्तिक वापर करण्यास रोखत नाही. त्यांचा हा किस्सा व्हायरल झाल्यापासून सर्वजण या घटनेवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात हनुमंतप्पा यांच्या घरात मल्लपुरा वितरण केंद्रातून लाईन काढली जाईल आणि त्यांना व्यवस्थित वीजपुरवठा मिळेल. सध्या हनुमंतप्पाने मसाले कुटण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याचा प्रवास थांबवला आहे, परंतु अद्याप त्यांच्या घरी वीज पोहोचलेली नाही.