'एका रात्री ताप आला अन् नेहमीसाठी झोप गायब झाली, मी 61 वर्षापासून झोपलो नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:01 AM2023-02-10T10:01:52+5:302023-02-10T10:04:57+5:30
अनेक वर्षापासून त्याची पत्नी आणि मुलांनी त्याला झोपलेला पाहिला नाही. फेमस यूट्यूबर Drew Binsky ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्तीने त्याची कहाणी सांगितली.
जगात एक अशीही व्यक्ती आहे जी कधीच झोपत नाही किंवा त्यांना झोपच येत नाही. या व्यक्तीचा दावा आहे की, ती गेल्या 61 वर्षांपासून झोपलीच नाहीये. त्याचा दावा आहे की, 1962 सालापासून त्याची झोप नेहमीचसाठी गायब झाली. अनेक वर्षापासून त्याची पत्नी आणि मुलांनी त्याला झोपलेला पाहिला नाही. फेमस यूट्यूबर Drew Binsky ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्तीने त्याची कहाणी सांगितली. याआधी अनेक मीडिया रिपोर्टमध्ये त्याला झोप येत नसल्याच्या स्टोरी छापून आल्या आहेत.
व्हिएतनाममध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव थाय एनजोक आहे. 80 वर्षीय एनजोक म्हणाले की, एका रात्री त्याना ताप आला होता आणि त्या रात्रीपासून ते पुन्हा कधी झोपू शकले नाहीत. एनजोकची मनापासून इच्छा आहे की, त्यांना झोप यावी.
डॉक्टर या आजाराला अनसोम्निया असं म्हणतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यवर वाईट परिणाम होतो. पण एनजोकच्या आरोग्यावर याचा काहीही परिणाम बघायला मिळत नाही.
80 वयातही ते फिरायला जातात, शेतात काम करणं हे त्यांचं रूटीन काम आहे. त्यांना ग्रीन टी आणि राइस वाईन पसंत आहे. व्हिडीओत त्यांनी सांगितलं की, काम केल्यानंतर सामान्य लोकांच्या तुलनेत त्यांना कमी थकवा जाणवतो. जेव्हा ते जास्त मद्यसेवन करतात तेव्हा 1-2 तास लेटतात. पण पूर्ण झोप त्यांना येत नाही.
ते रोज बेडवर जातात, डोळे बंद करतात, पण डोक्यात सतत काहीना काही सुरू असतं आणि झोप येत नाही. हजारो रात्री त्यांनी जागून काढल्या आहेत. व्हिडीओत एनजोक यांनी सांगितलं की, ते देशी दारू बनवण्याचं काम करतात. रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत काम चालतं.
त्यांनी असाही दावा केला आहे की, परदेशातून आलेल्या अनेक लोकांनी त्यांची रिअॅलिटी चेक केली आहे. अनेक लोकांनी तर रात्री त्यांच्यासोबत राहून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.