नशीबवान! ऑफीसच्या पार्टीत 'लकी ड्रॉ' जिंकला, मिळाली चक्क ३६५ दिवसांची भर पगारी सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:20 PM2023-04-15T13:20:02+5:302023-04-15T13:31:09+5:30
Paid Leave: चीनमधील एका व्यक्तीने ऑफिस पार्टीदरम्यान लकी ड्रॉमध्ये असा जॅकपॉट जिंकला, ज्याबद्दल संपूर्ण जग आश्चर्यचकित झालं आहे. त्याला ऑफिसमधून ३६५ दिवस म्हणजे पूर्ण वर्षाची रजा मिळाली आहे आणि तीही पगारी रजा म्हणजे वर्षभर काम न करता पगार मिळत राहील.
ऑफिसमधील कामासोबतच लोकांना सुट्टीही हवी असते. यामुळे मन आणि मेंदूला आराम मिळतो, इतकंच नव्हे तर सुट्टीवरुन परतल्यानंतर नव्या उत्साहानं काम करायलाही मजा येते. असे अनेक अहवाल आहेत, ज्यात असं म्हटलंय की जेव्हा एखादी व्यक्ती सुट्टीनंतर ऑफिसमध्ये येते तेव्हा त्याची उत्पादकता वाढते, म्हणजेच तो अधिक चांगलं काम करतो.
प्रत्येक कार्यालयात कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी दिली जाते, पण त्याशिवाय वर्षभरात अनेक सुट्ट्या असतात, त्याही ते घेऊ शकतात. पण बर्याच कंपन्यांमध्ये कर्मचार्यांना त्यांची सुट्टी (पेड रजा) घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चीनमधील एका व्यक्तीला ऑफिसमधून ३६५ दिवसांची सुट्टी मिळाली आहे आणि तीही भर पगारी.
सामान्यत: खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकावेळी फक्त १०-१५ दिवसांची पगारी रजा मिळते, पण जर कर्मचारी लग्नासाठी रजा घेत असेल, तर त्याची रजा महिनाभर देखील वाढवली जाऊ शकते. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात ६ महिन्यांची भर पगारी रजा दिली जाते. पण एखाद्या व्यक्तीला थेट एक वर्षाची पगारी रजा मिळाल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल.
ऑफिस पार्टीत जॅकपॉट जिंकला
चीनच्या शेनझेनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या ऑफिसमध्ये पार्टी सुरू होती. कार्यालयाची ती वार्षिक पार्टी होती. यादरम्यान कर्मचाऱ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला, ज्यामध्ये त्यांना कार्यालयीन सुट्टीसह विविध गोष्टी बक्षीस म्हणून मिळाल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशाच एका लकी ड्रॉमध्ये एका कर्मचाऱ्याचं नशीब फळफळलं. त्याला बक्षीस म्हणून ३६५ दिवसांची रजा मिळाली आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या रजेचे पैसे देखील कापले जाणार नाहीत म्हणजेच काम न करता दर महिन्याला त्याच्या खात्यात पगार जमा केला जाईल. पण कंपनीनं कर्मचाऱ्यासमोर काही दिवसांसाठी रजा देऊन उर्वरित रजांसाठी एनकॅशमेंटचा पर्याय देणार आहे. जेणेकरुन कर्मचारील लवकरात लवकर कामावर परतेल.