हसला असाल; पण रडायचं कसं हे कधी शिकलात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 05:34 AM2020-10-08T05:34:03+5:302020-10-08T05:34:14+5:30
जपानमध्ये एक शिक्षक सध्या अनेकांना रडायला शिकवतोय. त्यासाठी तो क्लासेसही घेतो. जगभरात त्याची चर्चा सुरू आहे. कोण आहे हा शिक्षक आणि का रडायला शिकवतोय, हेच आपण जाणून घेणार आहोत.
आजपर्यंत हास्यकट्टे आपण बरेच पाहिले असतील. रोज सकाळी एका ठिकाणी एकत्र येऊन जोर-जोरात हसण्याची मैफल या कट्ट्यांवर रंगत असते. पण, जर कोणी रडण्यासाठी खटाटोप करत असेल, लोकांना रडायला शिकवण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असेल तर?
जपानमध्ये एक शिक्षक सध्या अनेकांना रडायला शिकवतोय. त्यासाठी तो क्लासेसही घेतो. जगभरात त्याची चर्चा सुरू आहे. कोण आहे हा शिक्षक आणि का रडायला शिकवतोय, हेच आपण जाणून घेणार आहोत.
अनेकांच्या डोळ्यात आसवंच येत नाहीत. जपानी भाषेत याला रुई-कात्सू असे म्हणतात. याच रुई-कात्सूसाठी जपानचे हिदेफुमी योशिदा हे क्लासेस घेत आहेत. त्यांचा पहिला प्रश्न असतो, तुम्ही शेवटचं कधी रडला होता, कधी तुमच्या डोळ्यांतून आसवं बाहेर आली?
रडू नका असं लहानपणापासूनच आपल्याला शिकवलेलं असतं. त्यामुळे मोठे झाल्यावरही आपण रडत नाही. आपली आसवं आपण दाबून ठेवतो. पण रडण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या मनावरचा ताण त्यामुळे कमी होतो, दु:ख कमी होते आणि मन मोकळे होते, असं योशिदा सांगतात. त्यासाठीच त्यांनी हे क्लासेस सुरू केले आहेत. ते सेमिनार घेतात. त्यात ते अनेक व्हिडिओ दाखवतात. मनात खोलवर कुठेतरी त्या दृश्यांचा परिणाम होतो आणि त्याचे रूपांतर मग रडण्यात होते. आसवं येतात, अशी त्यांची साधी-सोपी थिअरी आहे.
रडू नका, हा विचारच लोकांच्या मनातून मला काढायचा असल्याचेही योशिदा सांगतात. जोपर्यंत मन मोकळं होत नाही, तोवर मनावरचा ताण कमी होणार नाही. त्यामुळे प्रसंगी रडणे हा उपाय असल्याचे ते म्हणतात.