९३ दिवस अटलांटिक महासागरात राहून १० वर्षाने आणखी तरूण झाली व्यक्ती, डॉक्टरही अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:50 PM2024-05-30T12:50:04+5:302024-05-30T13:00:30+5:30
हा कारनामा केलाय निवृत्त नेव्ही अधिकारी जोसेफ दितुरी यांनी. ते ९३ दिवस अटलांटिक महासागरात खोलवर एका कॉम्पॅक्ट पॉडमध्ये राहिले.
लोक आपलं वय कमी दिसण्यासाठी किंवा शरीर आणखी तरूण होण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण एका व्यक्तीने फारच कमाल केली. त्याने असं काही केलं जे बघून डॉक्टरही अवाक् झाले आहेत. एक व्यक्ती ३ महिने समुद्रात खोलवर राहिली आणि जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ती वर्ष आणखी तरूण झाली. हा कारनामा केलाय निवृत्त नेव्ही अधिकारी जोसेफ दितुरी यांनी. ते ९३ दिवस अटलांटिक महासागरात खोलवर एका कॉम्पॅक्ट पॉडमध्ये राहिले. त्यांनी अटलांटिक महासागराच्या तळाशी १०० वर्ग फुटाच्या पॉड ९३ दिवस काढले. असं एका रिसर्चसाठी करण्यात आलं. पाण्याखाली दबावाच्या वातावरणात राहिल्याने मानवी शरीरावर काय प्रभाव पडतो हे जाणून घेणं या रिसर्चचा उद्देश होता.
याआधी पाण्याखाली जास्तीत जास्त दिवस राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ७३ दिवसांचा होता. हा रेकॉर्ड दितुरी यांनी तोडला. आता त्यांनी दावा केला आहे की, जमिनीवर परत आल्यावर त्यांना १० वर्ष अधिक तरूण झाल्यासारखं वाटत आहे. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर काही टेस्ट केल्या आणि त्यांच्यात खूपसारे बदल बघायला मिळाले. त्यांच्या झोपेत ६० ते ६६ टक्के सुधारणा झाली. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ७२ टक्के कमी झालं. तसेच सूज आणि जखमाचे डाग अर्धे कमी झालेत.
पाण्याखाली राहून काय होतं?
डॉक्टरांनी सांगितलं की, पाण्याखाली दबावामुळे शरीरात वेगाने बदल झाले आणि शरीरावर सकारात्मक प्रभाव पडला. या रिसर्चमधून असं समजलं की, मानवी शरीर जास्त काळ दबाव असलेल्या वातावरणात राहिल्यावर कसं प्रतिक्रिया करतं. याने मेंदुच्या आरोग्यात सुधारणा होते. त्याशिवाय मेटाबॉलिज्ममध्येही सुधारणा होते. वजन वेगाने कमी होतं.
पाण्याखाली एक्सरसाइज
डेली मेलसोबत बोलताना दितुरी म्हणाले की, ते बरीच जागा आणि एक्सरसाइज मशीन असूनही व्यायाम बॅंडचा वापर करून आठवड्यातून पाच दिवस एक तास व्यायाम करून आपलं शरीर फीट ठेवत होते. त्यांनी पाण्याखाली राहण्याच्या फायद्यांबाबत सांगितलं की, "तुम्हाला एका अशा जागेही गरज आहे, जी बाहेरच्या हालचाली, बाहेरच्या गोष्टींपासून दूर आहे. लोकांना दोन आठवड्यांच्या सुट्टीवर तिथे पाठवा जिथे त्यांना आराम करायला मिळेल आणि अनोखा अनुभव मिळेल".