लाईनमध्ये उभं राहा, भरपूर कमवा; पठ्ठ्यानं शोधलाय अनोखा व्यवसाय, आहे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 04:39 PM2022-01-20T16:39:08+5:302022-01-20T16:40:45+5:30
आता त्याचा व्यवसाय इतका प्रसिद्ध झालाय की त्यानं आपल्या हाताखालीही कामासाठी मुलं ठेवली आहे. वाचा काय आहे ही रंजक कहाणी.
जगभरातील लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी सतत्यानं मेहनत करत असतात. दुसरीकडे जे लोक नोकरी करतायत तेदेखील आपलं काम पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. पण कल्पना करा की जर एखाद्या व्यक्तीनं फक्त रांगेत उभं राहून भरपूर पैसे कमावले तर? हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. लंडनमध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी नुसती रांगेत उभी राहून मोठी रक्कम कमावते. ही व्यक्ती इतकी प्रसिद्ध झालीये की ती आता श्रीमंत व्यक्तींसाठीही रांगेत उभी राहते.
तो लंडनचा रहिवासी असून त्याचे नाव फ्रेडी बेकिट आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, या व्यक्तीने स्वत: सोशल मीडियावर आपली कहाणी सांगितली आहे. एखाद्या म्युझिक कॉन्सर्टची तिकिटे काढण्यासाठी किंवा एक्झिबिशनची तिकिटे काढण्यासाठी लोक त्याला रांगेत उभे राहण्यासाठीच शोधतात, असंही त्यानं सांगितलं.
तासभर रांगेत थांबण्याऐवजी तो २० पौंड (सुमारे २ हजार रुपये) आकारतो, असेही रिपोर्टमध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर अनेकवेळा लोक केवळ बँका किंवा इतर आस्थापनांमध्ये रांगेत उभं करण्यासाठी त्यालाच शोधत असतात. या कामासाठी तो आता चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्याला या कामात आनंद मिळतोय आणि या कामाद्वारेदेखील तो चांगली रक्कम मिळवत आहे.
रिपोर्ट्सनुसार तो पगार मिळवणाऱ्यापेक्षाही तो जास्त पैसे कमावतो. ही व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून हेच काम करत आहे. सध्या त्यानं आपल्यासोबत अनेक मुलंही ठेवली आहेत. जेव्हा कोणी आपल्याशी संपर्क साधत तेव्हा त्या मुलांना रांगेत उभं राहण्यासाठी पाठवलं जातं, असंही तो म्हणाला. सध्या या व्यक्तीची ही कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.