चमत्कार... हृदय 18 तास बंद असतानाही 'तो' जिवंत राहिला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 09:49 AM2018-04-09T09:49:37+5:302018-04-09T09:49:37+5:30
५३ वर्षांच्या व्यक्तीची मृत्यूला हुलकावणी
अन् त्याच्या हृदयाची धडधड थांबली, असं वाक्य एखाद्या कथेत आल्यावर किंवा कोणी उच्चारल्यावर समोरच्या व्यक्तीनं जगाचा निरोप घेतला, हे आपल्याला समजतं. कारण हृदयानं काम करणं थांबवलं की आयुष्याची अखेर होते. मात्र फ्रान्समध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. एका ५३ व्यक्तीच्या हृदयाची धडधड तब्बल १८ तास थांबूनही ती व्यक्ती जिवंत राहिली आहे. यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त होत आहे.
फ्रान्समधील एका ५३ वर्षांच्या व्यक्तीच्या हृदयानं काम करणं थांबवलं. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १८ तास त्या व्यक्तीचं हृदय बंद होतं. मात्र त्यानंतर ते सुरु झालं आणि ती व्यक्ती चक्क मरणाच्या दारातून परत आली. त्या व्यक्तीला हायपोथर्मिया झाल्यानं त्याच्या शरीराचं तापमान वेगानं कमी झालं. त्यामुळे त्याच्या शरीराचे अवयव सुरक्षित राहिले.
या व्यक्तीच्या शरीराचे तापमान घटल्याची बाब लक्षात आल्यानं आपत्कालीन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या हृदयाची धडधड सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. या व्यक्तीला त्याच्या भावाच्या घरातून परतताना हृदय रोगाचा झटका आला. ही व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत नदी किनारी सापडली होती. सध्या या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जात आहे. लवकरच ही व्यक्ती पूर्णपणे बरी होईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.