चुकून सख्ख्या बहिणीसोबत लग्न, दोन मुलांनाही दिला जन्म; 6 वर्षांनी समोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:55 AM2023-03-16T10:55:26+5:302023-03-16T10:55:35+5:30
Man Married to His Sister : स्वत: व्यक्तीने याचा खुलासा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून केला. या व्यक्तीला त्याच्या जन्मानंतर लगेच कुणीतरी दत्तक घेतलं होतं.
Man Married to His Sister : जगभरात लग्नाबाबत वेगवेगळे रिती-रिवाज असतात. पण जास्तीत जास्त ठिकाणांवर एक गोष्ट समान पाळली जाते ती म्हणजे पती-पत्नीमध्ये रक्ताचं नातं असू नये. आपल्या देशात तर जात-धर्म अशा अनेक गोष्टी बघितल्या जातात. पण तरीही लग्न जुळवताना होणाऱ्या पती-पत्नीमध्ये रक्ताचं नातं असू नये याची काळजी घेतली जाते.
ही काही फक्त परंपरा नाही तर मेडिकल सायन्सही हे मानतं की, डीएनए आणि रक्त मॅच होणाऱ्या नात्यात लग्न केलं तर येणाऱ्या पिढींमध्ये जेनेटिक डिफेक्टचा धोका राहतो. एका व्यक्तीसोबत चुकून का होईना अशी घटना घडली. त्याला त्याच्या लग्नाच्या 6 वर्षानंतर समजलं की, ज्या मुलीसोबत त्याने त्याचा संसार थाटला, ती त्याची बहीण आहे.
सख्ख्या बहिणीसोबत केलं लग्न
मिररच्या एका रिपोर्टनुसार, स्वत: व्यक्तीने याचा खुलासा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून केला. या व्यक्तीला त्याच्या जन्मानंतर लगेच कुणीतरी दत्तक घेतलं होतं. अशात त्याला त्याच्या बायोलॉजिकल आई-वडिलांबाबत काहीच माहीत नव्हतं. मोठा झाल्यावर त्याचं अफेअर शहरातीलच एका तरूणीसोबत झालं आणि दोघांनी 2 वर्षाच्या डेटिंगनंतर लग्न केलं. त्यांना दोन मुलंही झाली. पण मुलांच्या जन्मानंतर पत्नी आजारी राहू लागली होती. या आजाराच्या उपचारादरम्यानच या गोष्टीचा खुलासा झाला की, ज्या मुलीसोबत त्याने लग्न केलं ती त्याची सख्खी बहीण आहे.
या व्यक्तीच्या पत्नीच्या किडनीमध्ये समस्या होती आणि त्यामुळे तिला ट्रांसप्लांटची गरज होती. तिच्या परिवारातील लोकांनी टेस्ट केल्या. पण कुणीही किडनी डोनेशनसाठी मॅच झाले नाही. पण जेव्हा पतीने टेस्ट केली तेव्हा तो केवळ मॅचच झाला नाही तर पॉझिटिव्हिटी रेट इतका हाय होता की, डॉक्टरही हैराण झाले.
डॉक्टरांनी व्यक्तीला सांगितलं की, सामान्यपणे आई-वडिलांसोबत मुलांचा मॅच रेट 50 टक्के असतो. पण भाऊ-बहिणीमध्ये हा मॅच रेट 100 टक्के असतो. पती-पत्नीमध्ये असं कधीच होत नाही. केवळ भाऊ-बहिणीमध्येच इतक्या हाय रेटसोबत मॅच होऊ शकतं. हे ऐकून व्यक्तीला धक्का बसला. कारण त्याच्या लग्नाला 6 वर्षे झाले आणि 2 मुलांसोबत तो सुखी संसार जगत आहे.