डोक्यात गोळी लागली तरी त्याला नव्हती कल्पना, रक्त पुसून पुन्हा पार्टीत होता गुंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:19 PM2024-01-23T14:19:35+5:302024-01-23T14:20:08+5:30
तो पार्टी करण्यात इतका बिझी झाला की, त्याला गोळी लागल्याचं जाणवलं नाही आणि अनेक दिवस मजेत पार्टी करत राहिला.
जगात अनेक अजब लोक आहेत. सामान्यपणे आपल्या खरचटलं तरी ते जाणवतं आणि त्यावर आपण उपचार शोधतो. पण एक असा तरूण आहे ज्याला बंदुकीची गोळी लागली तरी त्याला समजलं नाही. तो पार्टी करण्यात इतका बिझी झाला की, त्याला गोळी लागल्याचं जाणवलं नाही आणि अनेक दिवस मजेत पार्टी करत राहिला.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तरूणाच्या डोक्यात वेदना झाल्या आणि रक्तही आलं. पण त्याने पार्टीत नशेत रक्त पुसलं आणि नाचत राहिला. इतकंच नाही तर पार्टी संपल्यावर 300 किलोमीटर दूर आपल्या घरी गाडी चालवत गेला. दोन-तीन दिवस त्याला समजलंच नाही की, त्याला गोळी लागलीये.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, ब्राझीलच्या रियो दि जेनेरियला राहणारा मॅटियस फॅसियो नावाचा तरूण आपल्या मित्रांसोबत न्यू इअर पार्टी करत होता. यादरम्यान त्याच्या डोक्याला काहीतरी लागलं. त्याला वाटलं दगड असेल. त्याने त्या जागेवर आईस लावला. रक्त थांबलं तेव्हा तो पुन्हा पार्टी करू लागला. नंतर गाडी चालवत घरी गेला. पुढील दोन दिवस तो कामात बिझी होता आणि नंतर पुन्हा मित्रांसोबत पार्टीकेली. अखेर 4 जानेवारीला जेव्हा त्याच्या डाव्या हातात वेदना झाल्या तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये गेला.
डॉक्टरही झाले हैराण
डॉक्टरांनी जेव्हा सीटी स्कॅन केलं तेव्हा समोर आलं की, त्याच्या डोक्यात गोळी लागली आहे. मेडिकल स्टाफही हे बघून हैराण झाला की, त्याच्या डोक्यात गोळी लागली आहे आणि त्याला माहितही नाही. डॉक्टरांनी सर्जरी करून गोळी काढली.
गोळी 9 एमएम बुलेट होती आणि मॅटियसच्या मेंदुच्या एका भागात लागली होती. जिथे मेंदुला फार होणार नाही. त्यामुळेच त्याला गोळी लागल्याचं समजलं नाही. पण पुढे जाऊन हे इन्फेक्शन आणि त्याच्या मृत्यूचं कारण बनली असती. आता तो ठीक आहे.