चितेवर ठेवण्यापूर्वी अचानक तो जागा झाला, स्मशानभूमी सोडून पळाले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 03:04 PM2019-10-14T15:04:27+5:302019-10-14T15:15:32+5:30
जर स्मशानभूमीत चितेवर ठेवलेला मृतहेद अचानक हालचाल करू लागला तर कुणाचीही भंबेरी उडेल. असंच काहीसं ओडिशातील गंजम जिल्ह्यात झालं.
जर स्मशानभूमीत चितेवर ठेवलेला मृतहेद अचानक हालचाल करू लागला तर कुणाचीही भंबेरी उडेल. असंच काहीसं ओडिशातील गंजम जिल्ह्यात झालं. इथे लोक एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेले. पण चितेवर ठेवलेल्या 'मृतहेदात' हालचाल पाहून एका मिनिटाचाही उशीर न करता लोक तेथून पसार झाले.
ही अजब घटना कपकहाला गावात घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावातील राहणारा ५५ वर्षीय सीमांच मलिक शनिवारी त्याच्या बकऱ्या घेऊन जंगलात गेला होता. सायंकाळी बकऱ्या घरी परतल्या, पण मलिक काही आला नाही.
रविवारी सकाळी काही लोकांना मलिक एके ठिकाणी पडलेला दिसला. लोक त्याला घरी घेऊन गेले आणि परिवाराने मलिकला मृत समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याला स्मशानभूमीत घेऊन गेले. पण तिथे पोहोचताच चितेला अग्नी देण्यापूर्वीच मलिक शुद्धीवर आला. अचानक तो उठून उभा झाल्याने लोकांनी तेथून घाबरून पळ काढला.
नंतर काही लोक त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले आणि डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. सध्या त्याची प्रकृती चांगली असून त्याला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, मलिकला खूप ताप आला होता, त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता. त्याची पत्नी त्याला जिवंत बघून आनंदी आहे. पण तिला वाईटही वाटत आहे की, हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच तिने पतीला मृत घोषित केलं.