घ्या! आईला नाश्ता करता यावा म्हणून त्याने थांबवली रेल्वे, पण असं नसतं ना भौ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:08 PM2019-07-04T13:08:47+5:302019-07-04T13:18:36+5:30
तुम्ही जर रेल्वेने कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की, रेल्वेत आपातकालीन स्थितीत साखळी ओढून रेल्वे थांबवता येते.
तुम्ही जर रेल्वेने कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की, रेल्वेत आपातकालीन स्थितीत साखळी ओढून रेल्वे थांबवता येते. पण तुम्हाला हेही माहीत असेल की, काहीही कारण नसताना उगाच ही साखळी ओढून रेल्वे थांबवली तर मोठा दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. रेल्वेची साखळी ओढण्यासंदर्भातील एक अशीच वेगळी घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
एक तरूण त्याच्या आईसोबत दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करत होता. रेल्वेत नाश्ता दिला गेला. पण नाश्ता संपण्याआधीच त्यांचं स्टेशन आलं. आईचा नाश्ता व्हायचा होता आणि तिला नाश्ता शांततेने करता यावा म्हणून मुलाने रेल्वेची साखळी ओढून रेल्वे जास्त वेळासाठी जागेवर थांबवली.
मुलाचं नाव मनीष अरोरा आहे. त्याची आई आणि त्याला मथुरेला उतरायचं होतं. पण जेव्हा रेल्वे मथुरा स्टेशनला पोहोचली त्याची आई नाश्ता करत होती. त्यामुळे त्याने रेल्वेतील आपातकालीन साखळी ओढली. जेणेकरून काही वेळ रेल्वे मथुरा स्टेशनवरच थांबून रहावी. म्हणजे त्याचा आईचा नाश्ताही करणं होईल आणि दोघेही आरामात उतरतील.
(Image Credit : India Rail Info)
पण असं नसतं ना भौ....कारण कोणतही योग्य कारण नसताना रेल्वे थांबवणं हा एका गुन्हा आहे. आता काय....कोणतही योग्य कारण नसताना रेल्वेची साखळी ओढल्याने आणि रेल्वे थांबवल्याने मनीषला पकडण्यात आलं. त्याच्यावर रेल्वे अॅक्टच्या सेक्शन १४१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने त्याचा गुन्हा कबूलही केला. पण नंतर त्याला जामीन देण्यात आला.
(Image Credit : meets some expectations)
आरपीएफ आग्रा डिव्हिजननुसार, यावर्षी जून महिन्यापर्यंत साधारण ६ लाख रूपये रेल्वेची साखळी ओढण्याचा आरोपात पकडण्यात आलेल्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेत. आग्रा डिव्हिजन अंतर्गत आतापर्यंत साधारण ८५० प्रवाशी असं करताना पकडले गेले.