काय सांगता? 'ही' व्यक्ती वर्षातले ३०० दिवस झोपते; एकदा झोपल्यावर थेट २५ दिवसांनी उठते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 04:52 PM2021-07-12T16:52:59+5:302021-07-12T16:55:58+5:30
पुरखाराम यांना दुर्मिळ आजार; २३ वर्षांपासून आजारावर उपचार नाहीत
नागौर: पश्चिम राजस्थानच्या जोधपूरमध्ये असलेल्या नागौरमध्ये राहणारी एक व्यक्ती वर्षातील ३०० दिवस झोपते. या व्यक्तीची अंघोळ, जेवण सगळं काही झोपेतच होतं. अनेकांना हे वाचून विचित्र वाटलं असेल. मात्र ४२ वर्षीय पुरखाराम यांना एक दुर्मिळ आजार आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार पुरखाराम यांना एक्सिस हायपरसोम्निया हा आजार आहे. हा आजार मानसिक स्वरुपाचा आहे. पुरखाराम यांना २३ वर्षांपूर्वी हा आजार झाला. ते एकदा झोपल्यावर २५ दिवस उठत नाहीत. या आजारामुळे ग्रामस्थ पुरखाराम यांना कुंभकर्ण म्हणतात.
नागौर जिल्ह्यातल्या परबतसरमधील भादवा गावात पुरखाराम वास्तव्यास आहेत. त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. पुरखाराम यांना असलेल्या झोपेच्या आजारामुळे ते महिन्यातून जेमतेम ५ दिवस सुरू असतं. पुरखाराम यांना एक्सिस हायपरसोम्नियाचा आजार आहे. ते एकदा झोपले की २० ते २५ दिवस उठत नाही, असं त्यांचे नातेवाईक सांगतात. सुरुवातीला पुरखाराम ५ ते ७ दिवस झोपायचे. त्यांना झोपेतून उठवताना कुटुंबियांना बरेच कष्ट घ्यावे लागायचे.
२०१५ पासून आजार वाढला
पुरखाराम यांची झोप वाढू लागताच नातेवाईक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र सुरुवातीला डॉक्टरांना आजार लक्षात आला नाही. त्यानंतर पुरखाराम यांच्या झोपण्याचा कालावधी वाढतच गेला. आता ते अनेकदा २५ दिवस झोपतात. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याचं डॉक्टर सांगतात. हा आजार झाल्यावर व्यक्तीला सतत झोप येते. व्यक्तीला झोपेतून उठण्याची इच्छा असूनही शरीर त्याला साथ देत नाही. २०१५ पासून पुरखाराम यांचा आजार बळावला. २०१५ पर्यंत ते १८-१८ तास झोपायचे. मात्र आता ते २० ते २५ दिवस झोपतात.
खाणं-पिणं, सगळं काही झोपेतच
झोप येण्याच्या एक दिवस आधी पुरखाराम यांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. एकदा झोपल्यावर त्यांना झोपेतून उठता येत नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांना झोपेतून जेवण भरवतात. पुरखाराम यांच्या आजारावर अद्याप उपचार सापडलेला नाही. पुरखाराम लवकरच बरे होतील आणि आधीसारखं सर्वसामान्य आयुष्य जगतील, असा विश्वास त्यांची आई कंवरी देवी आणि पत्नी लिछमी देवी यांना आहे.