पती, पत्नी आणि कुत्रा...घटस्फोटापर्यंत गेला होता विषय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 01:19 PM2019-03-01T13:19:18+5:302019-03-01T13:21:26+5:30
अनेकदा घटस्फोट घेण्याची वेगवेगळी कारणे वाचून हसावं की रडावं असं व्हायला होतं. कारण घटस्फोटाची कारणे इतकी विचित्र असतात की, काही सुचणंच बंद होतं.
(Image Credit : DBPOST)
अनेकदा घटस्फोट घेण्याची वेगवेगळी कारणे वाचून हसावं की रडावं असं व्हायला होतं. कारण घटस्फोटाची कारणे इतकी विचित्र असतात की, काही सुचणंच बंद होतं. आता हेच बघा ना....एक पती त्याच्या कुत्र्यामुळे पत्नीला घटस्फोट देण्यास तयार झाला होता. ही घटना आहे पटणाची आणि या महिलेने पतीविरोधात तक्रारही दिली होती. म्हणजे बघा ना 'पति, पत्नी और वो' हे तर सगळ्यांनीच ऐकलं असेल पण 'पती, पत्नी आणि कुत्रा' हे पहिल्यांदाच ऐकत असतील.
चला नेमकं झालं काय हे जाणून घेऊया. तर महिलेने तक्रारीत सांगितले होते की, पती तिला कुत्र्यामुळे मारहाण करतो. ती सांगते की, 'जेव्हाही मी पतीच्या कुत्र्याला हाकलून देण्याचं बोलते, तेव्हा नवरा मला मारहाण करतो. इतकंच काय तर माझं साधं मेडिकल चेकअपही करत नाही. मला बाजारात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे'.
या महिलेने दावा केला होता की, पतीच्या पाळीव कुत्र्याने तिला तीनदा चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याला हाकलून लावण्याचा विषय निघाला. यावर पतीने तिला मारहाण केली होती. नंतर हे प्रकरण इतकं चिघळलं होतं की, पती त्याच्या कुत्र्यासाठी पत्नीला घटस्फोट देण्याच्या विचारापर्यंत येऊन पोहोचला होता.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. काउंसलिंगसाठी या महिलेच्या पतीला बोलावलं. पोलिसांनी सांगितले की, 'आमच्यासमोर एक हास्यास्पद केस आली होती. पती कुत्र्यासाठी त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी तयार झाला होता'. दुसरीकडे पती म्हणत होता की, 'जर तिला जायचं असेल मला काहीच अडचण नाहीये'.
मात्र, आता पती आणि पत्नीमधील वाद मिटले आहेत. पतीने आता शब्द दिला आहे की, तो यापुढे पत्नीला कधी मारणार नाही आणि धमक्याही देणार नाही.