दुबईहून नोकरी सोडून प्रेमासाठी गावी परतला प्रियकर, प्रेयसीसोबत पोलीस स्टेशनमध्ये केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:37 AM2021-06-23T11:37:51+5:302021-06-23T11:39:13+5:30
गोपालगंजमध्ये भोरे पोलीस स्टेशन परिसरातील खजुरहां गावात राहणारा आनंद कुमारच्या बहिणीचं लग्न इमिलिया गावात झालं होतं.
असं म्हटलं जातं की, खरं प्रेम असेल तर व्यक्ती कोणत्याही सीमा पार करून येतो. अशीच एक घटना गोपालगंजमधून समोर आली आहे. इथे एक तरूण आपलं प्रेम मिळवण्यासाठी दुबईमधील नोकरी सोडून आपल्या गावी परतला आणि पोलीस स्टेशन आपल्या प्रेयसीसोबत लग्न केलं.
गोपालगंजमध्ये भोरे पोलीस स्टेशन परिसरातील खजुरहां गावात राहणारा आनंद कुमारच्या बहिणीचं लग्न इमिलिया गावात झालं होतं. बहिणीकडे येत-जात असताना यादरम्यान याच गावातील संजना कुमारी नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम जडलं. अशातच तो याच काळात त्याला नोकरी लागल्याने तो दुबईला गेला. पण जाताना तो प्रेयसीला हे सांगून गेला की, तो लवकरच परत येईल आणि तिच्यासोबत लग्न करेल.
नोकरी सोडून प्रेमासाठी गावी परतला
तो दुबई असताना नेहमीच प्रेयसीला लग्नाची आठवण करून देत होता. मात्र, जेव्हा संजनाच्या कुटुंबीयांना दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत समजलं तेव्हा त्यांनी संजनासाठी दुसरा मुलगा शोधण्यास सुरूवात केली. याची माहिती संजनाने आनंदला दिली. आनंदला ही माहिती मिळताच सगळं काही सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. नोकरी सोडून त्याने प्रेयसीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. (हे पण वाचा : वाह रे वाह! पत्नीनेच पतीला दिली २ गर्लफ्रेन्ड्ससोबत लग्न करण्याची संमती; म्हणाला, "दुसरे माझ्यावर जळतात")
नोकरीचा दिला राजीनामा
आनंद घाईघाईने दुबईतील त्याच्या कंपनीत नोकरीचा राजीनामा दिला आणि रविवारी थेट आपल्या गावी पोहोचला. पण तो घरी गेला नाही. आनंद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने प्रेयसीलाही पोलीस स्टेशनमध्ये बोलवून पोलिसांना मदत मागितली. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सर्वातआधी दोघांच्याही कुटुंबीयांना बोलवलं आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पोलीस स्टेशनमधील मंदिरात लग्न
पोलीस अधिकारी सुभाष कुमार यांनी सांगितलं की, दोघेही वयस्क आहेत आणि दोघेही लग्न करण्यास तयार आहेत. आनंद आणि संजनाचं लग्न पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मंदिरात लग्न लावून देण्यात आलं. प्रेमीयुगुलाच्या या लग्नात पोलीस वराती होते आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांना आशीर्वाद दिला.
सध्या या भागात या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या लग्नात ना बॅंडबाजा होता ना लोकांची गर्दी. दोघांच्याही परिवारातील काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांना आशीर्वाद दिला. हे लग्न झाल्याने दोघेही आनंदी आहेत.