झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, एका छोट्या चुकीची मोठी शिक्षा मिळाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 06:56 PM2023-02-20T18:56:29+5:302023-02-20T19:05:30+5:30
अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे ज्यात झोपेत असताना एका व्यक्तीची दृष्टी गेली.
अमेरिकेतून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यात झोपेतून उठलेल्या एका तरुणाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. यामागचे कारण कॉन्टॅक्ट लेन्स असल्याचे मानले जात आहे. तुम्ही विचार करत असाल की, डोळ्यांच्या लेन्सने चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत होते, मग यामुळे दृष्टी कशी जाईल...? यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे म्हणणे आहे की, कॉन्टॅक्ट लेन्समुळे दृष्टी जाणे अत्यंत दुर्मिळ आहे.
द मिरर यूकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या माईकला झोपेतून उठल्यावर डोळ्यात संसर्ग झाल्याचे जाणवले. तो आपल्या कामाच्या ठिकाणी दुपारी थोडावेळ झोपला होता आणि उठल्यावर डोळ्यांना इजा झाल्याचे जाणवले. डॉक्टरांनी माईकच्या एका डोळ्याची दृष्टी गेल्याचे सांगितले अन् त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. माईकने सांगितले की, त्याला अनेकदा डोळ्यात इन्फेक्शन होत असे.
लेन्स लावल्यामुळे असे घडते, पण माईक त्याकडे दुर्लक्ष करायचा. माईकच्या या चुकीमुळे तो एका डोळ्याने आंधळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माईकच्या डोळ्यात बॅक्टेरिया विकसित झाला होता, ज्याला अकांथामोबा केरायटिस म्हणतात. यामुळे डोळ्याच्या ऊतींचा नाश होतो आणि दृष्टी जाते. माईकच्या बाबतीत याच बॅक्टेरियाने घात केला आणि माईकची दृष्यी हिरावली.
लेन्ससह झोपण्याचे तोटे
डोळ्यांमध्ये असलेल्या कॉर्नियाला ऑक्सिजनची गरज असते. लेन्स लावून झोपल्याने कॉर्नियाला ऑक्सिजन व्यवस्थित मिळत नाही आणि त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणे आहे. कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपल्यामुळे डोळ्यांमध्ये व्रणही तयार होतात. त्यामुळे चुकूनही लेन्स लावून झोपू नका. रात्री किंवा थोडा वेळ लेन्स लावून झोपल्यानेही डोळ्यांचे आरोग्य बिघडते. हळूहळू प्रकाश मंद होऊ लागतो.