Video - अरेरे! सुंदर दिसण्याची हौस पडली महागात; चेहऱ्याची लागली वाट, खर्च केले 52 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 03:47 PM2023-08-01T15:47:09+5:302023-08-01T15:53:27+5:30
वयाच्या 19व्या वर्षापासून सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. त्याने फिलर्सही करून घेतले. आता तो 26 वर्षांचा आहे
आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. इंग्लंडमधील मॅनचेस्टर येथे राहणाऱ्या लेवी जेड मर्फी नावाच्या या व्यक्तीने वयाच्या 19व्या वर्षापासून सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. त्याने फिलर्सही करून घेतले. आता तो 26 वर्षांचा आहे
लेवीने आतापर्यंत 50,000 पौंड (सुमारे 52.83 लाख रुपये) खर्च करून 15 ब्यूटी ट्रीटमेंट केल्या आहेत. लेवीने नाकाची शस्त्रक्रिया, तोंडावरची चरबी काढून टाकणे आणि ओठ मोठे करणे यासह अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या सगळ्यामागचं कारण सांगताना तो म्हणाला की, मला कंटाळा येत होता, म्हणून हे केलं. तो म्हणतो, "मी एकूण 15 शस्त्रक्रिया केल्या आहेत, शस्त्रक्रिया करणे मला नेहमीच आवडते."
"मला माझ्या चेहऱ्याचा खूप लवकर कंटाळा येतो, म्हणून वेळोवेळी मला ते बदलण्याची संधी मिळते, ज्यामुळे मला चांगले वाटते. लोक प्रत्येक ऋतूत त्यांच्या कपड्यांचे रीन्यू करतात परंतु मी माझा चेहरा करतो." लेवीने त्याच्या नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्याला लाखो लोकांनी लाइक केले आहे.
"मी अजूनही रिकव्हरी करत आहे, जरी मी हे सर्व पाच दिवसांपूर्वी केलं आहे. फेसलिफ्ट गुंतागुंतीचा सामना करत असल्याने ही आतापर्यंतची सर्वात कठीण रिकव्हरी आहे. शस्त्रक्रियेनंतर काही तासांनी, माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला सूज आली आहे. मला भीती होती की यामुळे माझ्या चेहऱ्याचा आकार खराब होईल. मात्र सूज आली असल्याने भविष्यात आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागतील, असं वाटतं" असं लेवीने म्हटलं आहे.