603 दिवस 5 स्टार हॉटेलात मज्जा अन् अचानक झाला गायब... बिलाचा आकडा पाहून सारेच चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:52 PM2023-06-21T16:52:15+5:302023-06-21T16:53:07+5:30

एवढ्या मोठ्या हॉटेलात असं घडलंच कसं? जाणून घ्या यामागची कहाणी

man stayed in 5 star hotel for 603 days and flew away without paying check bill amount shocking incidence ankush dutta bill fraud | 603 दिवस 5 स्टार हॉटेलात मज्जा अन् अचानक झाला गायब... बिलाचा आकडा पाहून सारेच चक्रावले

603 दिवस 5 स्टार हॉटेलात मज्जा अन् अचानक झाला गायब... बिलाचा आकडा पाहून सारेच चक्रावले

googlenewsNext

Hotel Bill Fraud Shocking : खोटेपणाच्या कथा आपण अनेकदा ऐकल्या असतील, पण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये जे प्रकरण समोर आले आहे ते धक्कादायक आहे. दिल्लीचा रहिवासी असलेला अंकुश दत्ता ६०३ दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिला आणि एकेदिवशी पैसे न देता गपचूप निघून गेला. नंतर हॉटेल व्यवस्थापनाला माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या व्यक्तीने हॉटेलमध्ये तब्बल ६०३ दिवस वास्तव्य केले. सर्वप्रकारच्या सेवांचा लाभ घेतला, पण त्यानंतर तो काहीही न सांगता निघून गेला. त्यामुळे त्याच्या वास्तव्याचे हॉटेलचे बिल जितके झाले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. हॉटेलचे काही कर्मचारीही दत्ता यांच्याशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या मूळाशी जाऊन पोलिसांचा तपास सुरू आहे.

पैसे न देता ६०३ दिवस हॉटेलमध्ये राहिला, बिलही भरमसाठ झालं...

ही बाब हॉटेल रोझेट हाऊस ऑफ एरोसिटीची असल्याचे सांगितले जात आहे. या हॉटेलचे संचालन करणाऱ्या बर्ड एअरपोर्ट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​विनोद मल्होत्रा ​​यांच्या तक्रारीवरून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कलम ४०८, ४२०, ४६८, ४७१, १२०बी अन्वये एफआयआर नोंदवला आहे. डीसीपी विमानतळ देवेश महेला यांनी याला दुजोरा दिला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत दिल्लीतील रहिवासी अंकुश दत्ता ६०३ दिवस हॉटेलमध्ये थांबल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्याचे शुल्क 58 लाख आहे. पण एक पैसाही न भरता त्याने चेक आउट केले आणि तो निघून गेला.

नक्की काय घडले? कसा घडला प्रकार?

फिर्यादीनुसार, हॉटेलच्या फ्रंट ऑफिस विभागाचे प्रमुख प्रेम प्रकाश यांनी गडबड करून अंकुश दत्ताला बराच वेळ राहू दिले. हॉटेल व्यवस्थापनाला संशय आहे की प्रेम प्रकाशने दत्ता यांच्याकडून काही रोख रक्कम काढण्यासाठी आणि त्यांना जास्त काळ राहण्यासाठी त्यांच्या इन-हाऊस सॉफ्टवेअर सिस्टममध्ये फेरफार केला असावा.

अंकुश दत्ता आणि प्रेम प्रकाश यांच्यासह हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी हा कट रचला असावा, असा आरोप आहे. तक्रारीनुसार, दत्ता यांनी 30 मे 2019 रोजी चेक-इन केले आणि एका रात्रीसाठी खोली बुक केली. मात्र दुसऱ्या दिवशी 31 मे रोजी चेकआऊट करण्याऐवजी तो 22 जानेवारी 2021 पर्यंत हॉटेलमध्येच राहिला. हॉटेलचा नियम असा आहे की जर एखादा पाहुणे ७२ तासांपेक्षा जास्त काळ थांबला आणि थकबाकी भरली नाही तर त्याची माहिती तातडीने हॉटेल व्यवस्थापन अधिकाऱ्यांना द्यावी. पण प्रेम प्रकाशने हे केले नाही.

पोलिस तक्रारीनुसार, हॉटेल मॅनेजरने प्रेम प्रकाश यांच्यावर दत्ताचे खाते योग्य दिसण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोपही केला होता आणि त्याची रक्कम दुसऱ्या पाहुण्यांच्या बिलात समायोजित करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच यासाठी बनावट व खोटी बिले तयार केली. अभिषेक दत्ताने 10 लाख, 12 लाख आणि 20 लाखांचे तीन धनादेश वेगवेगळ्या तारखांना दिल्याचेही हॉटेल व्यवस्थापनाला तपासात आढळून आले. मात्र ते चेक बाऊन्स झाले आणि ही बाब प्रेम प्रकाश यांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अनेक गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हेगारी कट, विश्वासघात, फसवणूक आणि खोटेपणा तसेच बनावट खाती, ओळख लपवणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, अद्याप याप्रकरणी डीसीपी विमानतळाकडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही.

Web Title: man stayed in 5 star hotel for 603 days and flew away without paying check bill amount shocking incidence ankush dutta bill fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.