जंगलात मित्रांसोबत शिकारीसाठी गेला अन् हरवला; 31 दिवस किडे-अळ्या खाऊन जगला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:59 PM2023-03-02T18:59:51+5:302023-03-02T20:39:04+5:30
जंगलात प्रत्येक रात्र त्याच्यासाठी काळरात्र होती.
Man lost in Forest: तुम्ही बेअर ग्रिल्सचा मॅन vs वाईल्ड हा शो पाहिला असेल. या शोमध्ये बेअर ग्रिल्स जंगलात किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी अडकल्यास जगण्याच्या विविध युक्त्या शिकवतो. यात तो जंगली प्राण्यांसह अळ्या-किडे खाताना दिसतो. आपल्याला हे घाण वाटत असेल, पण एक व्यक्ती खऱ्या आयुष्यात अशाच युक्त्यांमुळे जिवंत राहिला आहे.
चार मित्र जंगलात फिरायला गेले होते, यातील एकजण जंगलात हरवला. यानंतर त्याने 31 दिवस जंगलात किडे खाऊन काढले. तहान भागवण्यासाठी तो बुटांमध्ये पावसाचे पाणी जमा करुन प्यायला. या व्यक्तीने नुकताच आपला वेदनादायक अनुभव शेअर केला. जोनाथन अकोस्टा असे याचे नाव असून, तो बोलिव्हियातील अॅमेझॉन जंगलात शिकारीसाठी गेला होता.
यादरम्यान तो त्याच्या मित्रांपासून वेगळा झाला. जोनाथनने सांगितले की, तो एक महिन्यापेक्षा जास्त काळ जंगलात राहिला आणि किडे खाऊन जगला. पिण्यासाठी बुटांमध्ये पावसाचे पाणी जमा केले. जंगलात अडकल्यानंतर त्याला वन्य प्राण्यांची सतत भीती वाटायची. कारण, त्या जंगलात जग्वार, पेकारिस (डुकरांसारखे प्राणी) यांसारखे प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत.
जवळपास एक महिन्यानंतर जोनाथन त्याच्या मित्रांना सापडला. जोनाथनने स्वतः देखील कबूल केले की लोक त्याला शोधत असतील यावर त्याचा विश्वास नव्हता. नवीन आयुष्यासाठी त्याने देवाचे आभार मानले. जंगलात असताना त्याचे 17 किलो वजनही कमी झाले. यादरम्यान त्याच्या पायाचा घोटाही निखळला. पाण्याअभावी डिहायड्रेशनचाही सामना करावा लागला. पण, अखेर देवाच्या कृपेने त्याचा जीव वाचला.