मुलीच्या सुंदरतेवर वडिलांना होता संशय, DNA टेस्टमधून समोर आलं मोठं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:16 PM2024-11-11T15:16:39+5:302024-11-11T15:24:06+5:30
आजकाल डीएनए टेस्टकरून माहिती मिळवणं फारच सोपं झालं आहे. पण अनेकदा ही टेस्ट नुकसानकारकही ठरते.
जगाच्या कानाकोपऱ्यातून रोज वेगवेगळ्या विचित्र किंवा हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. कधी कधी तर काही घटना अशा असतात की, सहजपणे विश्वासही बसत नाही. डीएनए टेस्टबाबतच्या तर अनेक अचंबित करणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आजकाल डीएनए टेस्ट करून माहिती मिळवणं फारच सोपं झालं आहे. पण अनेकदा ही टेस्ट नुकसानकारकही ठरते.
व्हिएतनामच्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या लक्षात आलं की, वय वाढण्यासोबतच त्याची मुलगी आणखी सुंदर होत चालली आहे. अशात त्याने डीएनए टेस्ट करण्याचा विचार केला. या व्यक्तीला संशय होता की, ही त्याची मुलगीच नाही. मग काय डीएनए टेस्ट झाली आणि रिझल्टमधून जे समोर आलं ते हैराण करणारं होतं.
मुलीची सुंदरता अन् वडिलांना संशय
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीला त्याच्या टीनएजर मुलीची सुंदरता पाहून संशय आला की, ती त्याची मुलगी असू शकत नाही. मुलगी बालपणापासूनच सुंदर होती. पण ती मोठी होत गेली आणि त्याचा संशय वाढत गेला. शेवटी त्याने एक दिवस पत्नीसोबत याबाबत चर्चा केली. पत्नी भडकली आणि तिने डीएनए टेस्टला विरोध केला. त्यानंतर दोघेही मुलीला घेऊन दुसऱ्या शहरात रहायला गेली. त्यानंतर मुलीची शाळा नेहमीच बदलत होती. त्यानंतर आई-वडील हे जाणून घेण्यात बिझी झाले की, मुलीच्या जन्माच्या दिवशी कोणकोणत्या मुलींचा जन्म झाला.
शेवटी खुलासा झालाच...
शाळा बदलत असताना एक दिवस मुलीची मैत्री नवीन शाळेतील एका मुलीसोबत झाली. त्यांचा वाढदिवस एकच होता. जेव्हा तिने आपल्या नव्या फ्रेन्डला वाढदिवसाला बोलवलं तेव्हा तिच्या आईचा चेहरा फ्रेन्डसोबत जुळत होता. त्यानंतर डीएनए टेस्ट करण्यात आली. रिपोर्टमधून समोर आलं की, मुलीची फ्रेन्डच तिची मुलगी आहे, जी हॉस्पिटलमध्ये बदलण्यात आली होती. दोन्ही परिवारांनी नंतर भेटीगाठी वाढवल्या. कारण त्यांची इच्छा होती की, स्वत: मुलींनी हे ठरवावं की, त्यांना कुठे रहायचं आहे. मात्र, हे समोर येऊ शकलं नाही की, परिवाराने हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई केली की नाही.