अजब ! ट्राफिकमध्ये अडकू नये म्हणून रोज 2 किमी पोहून 'तो' पोहोचतो ऑफिसला

By Shivraj.yadav | Published: July 26, 2017 01:43 PM2017-07-26T13:43:10+5:302017-07-31T16:29:17+5:30

शहरात राहायचं म्हणजे सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे वाहतूक कोंडीची

A man swims to avoid traffic | अजब ! ट्राफिकमध्ये अडकू नये म्हणून रोज 2 किमी पोहून 'तो' पोहोचतो ऑफिसला

अजब ! ट्राफिकमध्ये अडकू नये म्हणून रोज 2 किमी पोहून 'तो' पोहोचतो ऑफिसला

googlenewsNext

बर्लिन, दि. 26 - शहरात राहायचं म्हणजे सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे वाहतूक कोंडीची. एकीकडे शहराचा विकास होत असताना ही समस्याही गंभीर होत असते. खासकरुन सकाळी लवकर उठून ऑफिसला जाणा-यांसाठी ही समस्या खूपच त्रासदायी असते. अनेकदा वेळेत घरातून निघूनही वाहतूक कोंडीमुळे त्यांना उशीर होतो. काही वेळा तर तासनतास वाहतूक कोंडीत घालवावे लागतात. ही समस्या फक्त भारतातच नाही तर परदेशातही असून तेथील नागरिकही त्रस्त आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी म्हणा किंवा यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करतात. मात्र जर्मनीमधील एका व्यक्तीने या समस्येवर गमतीशीर उपाय शोधून काढला आहे. 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीमधील म्युनिक शहरात राहणारे बेंजमिन डेव्हिड या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त होते. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा त्यांनी ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर व्हायचा. मात्र आता त्यांना या समस्येला सामोरं जावं लागत नाही. कारण ऑफिसला जाण्यासाठी डेव्हिड आता रस्त्याचा नाही, तर नदीच्या मार्गाचा वापर करत आहेत. डेव्हिड रोज दोन किमी पोहून ऑफिसला पोहोचत आहेत. 

डेव्हिड रोज आपले कपडे, लॅपटॉप आणि बूट एका वॉटरप्रूफ बॅगेत भरतात आणि शहराच्या मध्यभागी वाहणा-या इसार नदीतून पोहून ऑफिसला पोहोचतात. यासाठी त्यांना रोज दोन किमीपर्यंत पोहोवं लागतं. अनेकांनी डेव्हिड यांच्या या युक्तीची खिल्ली उडवली. मात्र आपल्याला याचा काहीच फरक पडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे माझा वेळ वाचत असून, मला आता हे आवडू लागलं आहे असं डेव्हिड यांनी सांगितलं आहे.

डेव्हिड यासाठी पुर्ण काळजीदेखील घेतात. नदीतील दगड, काचा पायाला लागून जखम होऊ नये यासाठी ते चप्पल घालूनच पोहतात. सोबतच बॅगमध्ये पाणी अजिबात जाणार नाही याचीही काळजी घेतली जाते. महत्वाचं म्हणजे नदीत जाण्याआधी पाण्याची पातळी आणि वेगाची ते माहिती घेतात. थंडीमध्ये मात्र ते रस्त्याने जाणं पसंद करतात. थंडीच फार कमी वेळा ते नदीच्या मार्गाचा वापर करतात. त्यांच्या या निर्णयाचं काहीजणांना विशेष कौतुकही वाटतं, आणि तेदेखील त्यांच्यासोबत पोहत येण्याचा निर्णय घेतात. समस्या कितीही गंभीर असली तरी त्यातून मार्ग असतो असंच काहीसं डेव्हिड सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 

Web Title: A man swims to avoid traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.