तीन चेहऱ्यांचा माणूस कधी पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 12:07 PM2018-04-18T12:07:57+5:302018-04-18T12:07:57+5:30
दोनदा चेहरा प्रत्यारोपण झालेला जगातील एकमेव माणूस
पॅरिस: जेरॉम हॅमॉन यांना आता तीन चेहऱ्यांचा माणूस अशी नवी ओळख मिळाली आहे. जेरॉम यांच्या चेहऱ्याचं दोनदा प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. याआधी जगात कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याचं दोनदा प्रत्यारोपण करण्यात आलेलं नाही. चेहरा प्रत्यारोपणाच्या दुसऱ्या सर्जरीनंतर ते दोन महिने पॅरिसमधील रुग्णालयात होते. आता त्यांनी त्यांची नवी ओळख स्वीकारली आहे.
जेरॉम हॅमॉन यांचा चेहरा आता स्थिर आहे. मात्र आताही त्यांची त्वचा एकरुप झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. याशिवाय यामध्ये औषधांची भूमिका महत्त्वाची असते. पॅरिसमधील जॉर्जेस-पॉम्पिडो युरोपियन रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनं अभूतपूर्व कामगिरी करत एकाच व्यक्तीच्या चेहऱ्याचं दोनवेळा प्रत्यारोपण केलं. प्लास्टिक सर्जरीचे प्रोफेसर लॉरेंट लँटिरी यांनी या टीमचं नेतृत्व केलं. लॉरेंट यांनीच 2010 मध्ये जेरॉम हॅमॉन यांच्या पूर्ण चेहऱ्याचं प्रत्यारोपण केलं होतं.
जेरॉम हॅमॉन neurofibromatosis टाईप 1 ग्रस्त आहेत. ज्यामुळे ट्युमर होतो. 2010 मध्ये हॅमॉन यांच्या चेहऱ्याचं पहिल्यांदा प्रत्यारोपण झालं. हे प्रत्यारोपण यशस्वी झालं होतं. मात्र त्याचवर्षी हॅमॉन यांना साधारण सर्दीसाठी एक अँटीबायोटिक औषधं देण्यात आलं. त्यामुळे 2016 मध्ये त्यांचा प्रत्यारोपण केलेला चेहरा बिघडू लागला. त्यामुळे त्यांचा दुसरा चेहरा खराब होऊ लागला. हा त्रास इतका वाढला की, हॅमॉन यांना गेल्या वर्षी प्रत्यारोपण केलेला चेहरा हटवावा लागला. त्यामुळे हॅमॉन काही काळ बिनचेहऱ्याचे होते. त्यावेळी हॅमॉन यांना भुवया, कान, त्वचा नव्हती. त्यांना बोलताही येत नव्हतं आणि खाताही येत नव्हतं. यानंतर जानेवारीत त्यांना डोनर मिळाला आणि मग चेहरा प्रत्यारोपण यशस्वी झालं.