व्यक्तीने रस्त्यावर उडवले 1.6 कोटी रूपये, परिवाराचं बॅंक खातं केलं रिकामं; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 09:47 AM2023-04-17T09:47:24+5:302023-04-17T09:47:51+5:30
ओरेगनमध्ये राहणारा 38 वर्षीय कॉलिन डेविस मॅक्कार्थी एक कार ड्रायव्हर आहे. त्याला दुसऱ्यांची मदत करणं खूप आवडतं. तो नेहमीच लोकांची सेवा करत होता.
लोकांची मदत करणारे दिलदार लोक जगात कमी नाहीत. असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई गरीब लोकांमध्ये वाटली. अनेक अब्जोपती लोक आपल्या कमाईतील मोठी भाग लोकांच्या सेवेसाठी खर्च करतात. यात एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे हे लोक स्वत:साठीही काहीना काही वाचवून ठेवतात. पण अमेरिकेतील एका ड्रायव्हरने आपल्या परिवाराची पूर्ण संपत्ती रस्त्यावर उडवली.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ओरेगनमध्ये राहणारा 38 वर्षीय कॉलिन डेविस मॅक्कार्थी एक कार ड्रायव्हर आहे. त्याला दुसऱ्यांची मदत करणं खूप आवडतं. तो नेहमीच लोकांची सेवा करत होता. एक दिवस त्याला वाटलं की, बॅंकेत पैसे ठेवून काय करायचं, ते लोकांच्या कामात येतील. आपण त्यांना पैसे दिले तर ते आपल्याला आशीर्वाद देतील. ज्यानंतर आपण पुन्हा मालामाल होऊ.
मॅक्कार्थीने आपल्या परिवाराच्या बॅंक खात्यातील 200,000 डॉलर म्हणजे साधारण 1.6 कोटी रूपये काढले आणि ओरेगन इंटरस्टेट हायवेवर जाऊन कारमधून ते बाहेर उडवले. अचानक पैशांचा पाऊस पाहून हायवेवर एकच गोंधळ झाला. हजारो लोक पैसे गोळा करू लागले. अनेक कार चालक पैसे घेऊन मालामाल झाले. हे बघून पोलीस मॅक्कार्थीच्या मागे लागले. त्याला पकडलं, पण काही कारवाई केली नाही.
पोलिसांना या गोष्टीची चिंता सतावत होती की, पैसे गोळा करण्याच्या नादात एखादा अपघात होऊ नये. कारण तिथे गर्दी जमा झाली होती. ज्यांना पैसे मिळाले ते मालामाल झाले, पण ज्यांना मिळाले नाही ते निराश झाले. ते म्हणाले की, मॅक्कार्थी चांगलं काम करत होता. त्याच्यावर काही कारवाई होऊ नये. दुसरीकडे मॅक्कार्थीचा परिवार कंगाल झाला. त्यांना लोकांना पैसे परत देण्याचं आवाहन केलं, पण कुणीही परत दिले नाहीत. पोलिसही परिवाराची काही मदत करू शकत नाही कारण मॅक्कार्थीचंही बॅंक खात्यात नाव होतं. त्याला पैसे काढण्याचा अधिकार दिला होता.