मुलीसाठी नवरा न शोधणं मॅट्रिमोनियल कंपनीला पडलं महागात; भरावा लागला दंड...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 03:08 PM2019-10-19T15:08:58+5:302019-10-19T15:12:07+5:30
आजकाल लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पण यावरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत असतात.
(Image Credit : www.oyorooms.com)
आजकाल लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पण यावरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत असतात. अशीच एक घटना चंडीगढहून समोर आली आहे. येथील एका मॅट्रिमोनिअल सेवा पुरवणाऱ्या कंपनीला एका ग्राहकाच्या मुलीसाठी नवरदेव शोधणं चांगलंच महागात पडलं आहे. या कंपनीला मुलीसाठी मुलगा शोधून न शकल्याने ६२ हजार रूपये दंड द्यावा लागणार आहे.
सुरेंद्र पाल सिंह चहल आणि त्यांची पत्नी नरेंद्र कौर चहल यांनी चंडीगढ ग्राहक संरक्षण मंचमध्ये ६ डिसेंबर २०१८ ला एक तक्रार दाखल केली. यात सांगण्यात आलं की, २०१७ पासून ते त्यांच्या डॉक्टर मुलीसाठी मुलगा शोधत आहेत. यादरम्यान त्यांना वेडिंग विश प्रायव्हेट लिमिटेडची माहिती मिळाली. त्यांच्या मुलीला मंगळ होता. त्यामुळे त्यांनी मॅट्रोमोनिअल कंपनीला सांगितले की, चंडीगढ आणि आसपासच्या परिसरातील जाट समुदायातील मंगळ असलेल्या डॉक्टर मुलांचे प्रोफाइल उपलब्ध करून द्या.
चहल परिवाराने यासाठी २६ सप्टेंबर २०१७ ला कंपनीसोबत एक अग्रीमेंटही केलं होतं. त्यांनी रॉयल पॅकेज घेतलं. यासाठी त्यांनी ५० हजार रूपये भरले. तक्रारीत त्यांनी सांगितले की, कंपनीने जे प्रोफाइल पुरवले होते, त्यातील एकही ठरल्याप्रमाणे किंवा मागणी केल्यानुसार नव्हते.
तक्रारदारांचं म्हणणं आहे की, एकतर मॅट्रोमोनिअल कंपनी मुलांचे योग्य प्रोफाइल उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले. त्यात आमचा वेळही वाया गेला. इतकेच नाही तर चहल परिवाराने कंपनीला सूटही दिली होती की, चंडीगढच्या ६० किलोमीटर परिसरातील कुठलाही मुलगा चालेल. तरी सुद्धा कंपनी काहीच करू शकली नाही.
आता मॅट्रोमोनिअल कंपनी ग्राहकाचा वेळ वाया घालवण्याच्या आरोपात दोषी आढळली. त्यामुळे आता कंपनीला शिक्षा म्हणून ग्राहकांना ५० हजार रूपये दंड द्यावा लागणार आहे. त्यासोबतच ९ टक्के सर्व्हिस चार्ज वेगळा द्यावा लागेल. तसेच यात ७ हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागतील. तसेच ५ हजार रूपये कायदेशीक कारवाईच्या खर्चाचे देखील द्यावे लागणार आहेत.