डिलिव्हरी बॉयनं स्वत:च कॅन्सल केली ऑर्डर, नंतर ग्राहकाच्या घरासमोरच बसून खाऊनही टाकलं
By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 11:03 AM2021-01-23T11:03:19+5:302021-01-23T11:05:58+5:30
या घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल
हल्ली अनेकदा आपण बाहेर हॉटेल किंवा रेस्तराँमध्ये जाऊन खाणं आणण्यापेक्षा त्यासाठी अॅपचा वापर करतो. यावरून ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ थेट आपल्या घरापर्यंतही येतात. ही हल्ली सगळीकडेच सर्वसामान्य बाब झाली आहे. परंतु अनेकदा असंही होतं की आपण ऑर्डर तर करतो परंतु ते आपल्याकडे पोहोचेपर्यंत आपली भुकही निघून जाते. अशीच एक घटना ब्रिटनमधील लंडन येथे घडली. एका महिलेनं आपल्यासाठी मॅकडोनाल्डमधून खाणं ऑर्डर केलं. परंतु झालं असं की डिलिव्हरी बॉयनं तिची ऑर्डर केली कॅन्सल आणि तिच्याच घरासमोर बसून तो ती खाऊही लागला.
यानंतर या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो डिलिव्हरी बॉय त्या महिलेच्या घरासमोर बसून काही खाताना दिसत आहे. इंडिया टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार त्या महिलेनं जस्ट ईटवरून खाणं ऑर्डर केलं होतं. आपल्या कंपनीकडून ग्राहकांना उत्तम सेवा मिळत राहावी हेच आमचं ध्येय आहे. समोर आलेल्या व्हिडीओचा आम्ही तपास करू आणि त्यावर कारवाईदेखील करू. आम्ही त्या ग्राहकाच्यादेखील संपर्कात आहोत, असं कंपनीच्या प्रवक्यांकडून सांगण्यात आलं.
यापूर्वी २०१८ मध्येही असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये एक डिलिव्हरी बॉय रस्त्यावरच गाडी थांबवून ग्राहकानं ऑर्डर केलेले पदार्थ खात असताना दिसला होता.