बाबो! ९.७१ कोटी रूपयांना विकलं गेलं हे कबूतर, पण इतकं महाग का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:59 PM2019-03-19T13:59:58+5:302019-03-19T14:02:46+5:30
एखादं कबूतर कोट्यवधी रूपयांना विकलं जाईल याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल किंवा एखादं कबूतर कोट्यवधी रूपयांना विकलं जाईल यावर सहजासहजी विश्वासही बसत नाही.
एखादं कबूतर कोट्यवधी रूपयांना विकलं जाईल याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल किंवा एखादं कबूतर कोट्यवधी रूपयांना विकलं जाईल यावर सहजासहजी विश्वासही बसत नाही. पण बेल्जियममध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका लिलावात एक कबूतर १.२५ मिलियन यूरो(९.७१ कोटी रूपये) ला विकलं गेलं. रिपोर्ट्सनुसार, ९.७१ कोटी रूपयांना विकल्या गेलेल्या या कबूतराचं नाव 'अर्मांडो' असं आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यात हे सर्वात चांगलं कबूतर असल्याचं सांगितलं जात आहे.
या लिलावाआधी हे सर्वात महागडं कबूतर ३.७६ लाख यूरो(२.९२ कोटी रूपये) ला विकलं गेलं होतं. लिलाव केलेल्या कंपनीने सांगितले की, हा रेकॉर्ड तेव्हाच तुटला जेव्हा अर्मांडोला लिलावासाठी आणलं गेलं. हे कबूतर यावर्षी ५ वर्षांचं झालं. सध्या हे कबूतर रिटायमेंटचा आनंद घेत आहे.
लिलाव करणारी कंपनी पीपाचे सीईओ निकोलास गाएसेलब्रेख्त यांना अजिबात अंदाज नव्हता की, हे कबूतर इतकं महागडं विकलं जाईल. ते सांगतात की, 'मी कधी स्वप्नातही या किंमतीचा विचार नव्हता केला. आम्हाला अपेक्षा होती की, या कबूतराला ४ ते ५ लाख यूरो इतकी किंमत मिळेल'.
कुणी खरेदी केलं हे कबूतर?
निकोलस यांनी सांगितले की, चीनच्या काही लोकांनी या कबूतरासाठीची बोली वाढवून लावली होती. त्यामुळे एका तासाच्या आत बोली ५.३२ लाख यूरोवरून १.२५ मिलियन यूरोवर पोहोचली. हवेतील शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या या कबूतरांची किंमत सामान्यपणे २,५०० यूरो म्हणजे २ लाख रूपयांपर्यंत असते.
अर्मांडो नाही सामान्य कबूतर
अर्मांडो हे सामान्य कबूतर नाही. या कबूतराचे अनेक फॅन्स आहेत. या कबूतराने २०१८ मध्ये 'ऐस पिजन चॅम्पियनशिप', २०१९ मध्ये 'पिजन ओलंपियाड' आणि 'अंगूलेम' शर्यती जिंकल्या आहेत. अर्मांडोचे नवे मालक त्याच्याकडून आता काहीच काम करवून घेणार नाहीत. आता त्याचं काम केवळ वंशाला पुढे वाढवणे हेच असेल.