इयत्ता १० वी फेल तरुणाचं नशीब पालटलं! प्रेमासाठी रिक्षावाला पोहोचला थेट स्वित्झर्लंडला, नेमकं काय घडलं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:13 PM2022-01-18T19:13:58+5:302022-01-18T19:14:36+5:30
कुणाचं नशीब केव्हा पालटेल हे काही सांगता येत नाही. विशेषत: जेव्हा प्रेमाचा विषय येतो तर मग काही सांगायला नको. माणूस प्रेमासाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास तयार होतो आणि त्याच्यात बळ येतं.
कुणाचं नशीब केव्हा पालटेल हे काही सांगता येत नाही. विशेषत: जेव्हा प्रेमाचा विषय येतो तर मग काही सांगायला नको. माणूस प्रेमासाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास तयार होतो आणि त्याच्यात बळ येतं. जयपूरमधील एका रिक्षाचालक तरुणाचंही असंच काहीसं झालं आहे. प्रेमासाठी एक दिवस आपण थेट स्वित्झर्लंडला पोहोचू आणि आपलं नशीब असं पालटेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. या सुंदर प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊयात...
जयपूरमध्ये राहणारा रणजीत सिंह राज याला अभ्यासात अजिबात रस नव्हता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यानं शाळा सोडली. इतकंच काय तर तो इयत्ता १० वीची परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकला नाही. यामुळे त्याला रोजंदारीसाठी ऑटोरिक्षा चालवण्याची वेळ आली. त्यानं बरीच वर्ष ऑटोरिक्षा चालवण्याचा काम केलं. याच दरम्यान परदेशी पर्यटनांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला त्यांची भाषा बोलता आली पाहिजे याची जाणीव झाली. मग याच प्रेरणेतून दहावी फेल रणजीतनं इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली आणि स्वत:ची ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. यातच एक दिवशी त्याची भेट फ्रान्समधील एका महिलेशी झाली. ती भारत भ्रमंतीसाठी आली होती. रणजीत राज हाच तिचा गाइड होता आणि त्यानं या परदेशी पर्यटकाला जयपूरची सैर घडवली.
राजच्या म्हणण्यानुसार ती तिच्या एका मित्रासोबत भारतात आली होती. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं आणि हळूहळू जवळीक निर्माण झाली. काही दिवसांनी दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले. भारत भ्रमंती झाल्यानंतर ती फ्रान्सला परतली. त्यानंतर दोघं Skype च्या माध्यमातून एकमेकांशी संवास साधत होते. हळूहळू दोघांनाही त्यांचं प्रेम खूप भक्कम झाल्याचं लक्षात आलं. यातच राजनं अनेकदा फ्रान्समध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला व्हिसा मिळू शकला नाही.
दोघांनी मग एकदा फ्रान्सच्या दूतावासाबाहेर आंदोलन देखील केलं. त्यानंतर दोघांना तीन महिन्याचा व्हिसा देखील मिळाला. २०१४ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकल्याचं सांगितलं जात आहे. लग्नानंतर दोघं आता आई-वडील देखील झाले आहेत. त्यानंतर दोघांनीही लॉन्ग व्हीसासाठी अर्ज दाखल केला आहे. तसंच राजनं फ्रेंच भाषा देखील शिकली आहे. दोघंही सध्या स्वित्झर्लंडमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करत आहेत आणि आपलं स्वत:चं रेस्टॉरन्ट सुरू करण्याचं दोघांचं स्वप्न आहे.