साडी कशी नेसावी याचे अफलातून प्रयोग करणारे पुुरुष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 07:56 AM2022-03-08T07:56:02+5:302022-03-08T07:56:09+5:30

रुढी-परंपरा आणि पूर्वग्रहांचे संकेत मोठ्या हिमतीनं तोडत पुढे जाण्याचा आणि आपल्याला जे योग्य वाटेल ते करण्याचा, त्याप्रमाणे जगण्याचा एक ...

Men experimenting with how to wear a sari | साडी कशी नेसावी याचे अफलातून प्रयोग करणारे पुुरुष

साडी कशी नेसावी याचे अफलातून प्रयोग करणारे पुुरुष

Next

रुढी-परंपरा आणि पूर्वग्रहांचे संकेत मोठ्या हिमतीनं तोडत पुढे जाण्याचा आणि आपल्याला जे योग्य वाटेल ते करण्याचा, त्याप्रमाणे जगण्याचा एक ट्रेंड हळूहळू रुढ होऊ पाहतो आहे. आजच्या महिला दिनानिमित्तानं ‘ब्रेक द बायस’ या हॅशटॅगखाली केवळ महिलाच नाही, तर पुुरुषही रुढ संकेतांना मोठ्या प्रमाणावर धक्के देत आहेत. 

महिला, मुलींसारखं चालणं, बोलणं, वागणं, त्यांच्यासारखे मुरके मारणं याबद्दल आजवर अनेक मुलांना हिणवलं गेलं असेल. पण आता हे चित्र बदलते आहे.  साडी कशी नेसावी, याचे धडे  महिलांना देणारे  तरुण पुुरुष हे यातलेच एक देखणे उदाहरण!  पुरुषही साडीत ‘देखणे’ आणि ‘मर्दानी’ दिसू शकतात, असा नवा ट्रेंड हे तरुण रुजवू पाहताहेत. साड्यांच्या दुकानात महिलांपेक्षाही अधिक कुशलतेनं साडी नेसून दाखविणारे पुुरुष विक्रेते असतातच, पण तीच साडी नेसून हिमतीनं बाहेर पडण्याचा, जगासमोर जाण्याचा ट्रेंड आता ‘पॉप्युलर’ होऊ पाहतो आहे. अमूक कपडे फक्त महिलांनीच घालायचे, अमूक स्टाईल फक्त पुरुषांनीच करायची हे संकेत  झपाट्यानं मोडीत निघत असून, जेंडल न्यूट्रल फॅशनकडे जग झपाट्यानं सरकत आहे.
या संदर्भात फॅशन जगतात भारतातली काही पुरुषांची नावं आहेत : सिद्धार्थ बत्रा, करन विग आणि पुष्पक सेन..

सिद्धार्थ बत्रा
आपल्या फॅशन चॉईसबद्दल फॅशन इन्फ्लुएन्सर सिद्धार्थ बत्रा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून त्याचे फोटो, व्हिडीओ तो नेहमी इन्स्टाग्रामवर टाकत असतो. विशिष्ट पद्धतीनं ही साडी कशी नेसायची, याचे धडेही  देत असतो. 
महिला त्याच्या स्टाईलच्या दिवान्या आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्यानं  पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्टवर प्रिंटेड लाल आणि काळ्या रंगाची साडी आपल्या अनोख्या अंदाजात नेसली आहे आणि साडीवर ब्लेझर घातलं आहे.  त्याचा हा लूक सगळ्यांना प्रेमात पाडतो आहे. 

करण विग 
फॅशन डिझायनर करण विग बहुतांश वेळा साडी नेसूनच दिसतो. वेगवेगळ्या भन्नाट स्टाईलने साडी नेसण्याचे प्रकार शोधून काढणं ही त्याची आवडती गोष्ट. वेगवेगळे हटके प्रकार करुन आपण नेसलेल्या साडीला स्टाईल स्टेटमेंट बनवायचं ही त्याची खासियत. 

पुष्पक सेन 
कोलकात्याचा  फॅशन डिझायनर पुष्पक सेननं तर केवळ भारतातच नाही, विदेशातही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. इटलीमध्ये त्यानं फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं, पण तिथले लोकही त्याला ओळखतात ते त्याच्या स्टायलिश साडी लुकमुळे!  सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोत तो लाल रंगाच्या साडीत दिसतो. त्यावर त्यानं ब्लेझर घातलेलं आहे. भरगच्च दाढी, पायात शूज, इंडो-वेस्टर्न पद्धतीनं नेसलेली साडी आणि गळ्यातलं भलं मेाठं डोरलं, डाेळ्यांवर स्टायलीश चष्मा शिवाय त्याची आवडती बिंदी लावायलाही तो  विसरलेला नाही... ‘सारी विथ बिंदी’ हे त्याचं एक अनोखं स्टाईल स्टेटमेंट आहे.
- अलीकडच्या काळाचा विचार केला, तर लिंगभेद निरपेक्ष कपडे घालण्याची आणि ती ‘स्टाईल’ अभिमानाने मिरवण्याची राजबिंडी पद्धत रुढ केली ती रणवीर सिंगने! ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या वेळी घोळदार घागरा घातलेला रणवीर सगळ्यांना आठवत असेल. 
 कोणी कोणते कपडे घालावेत ही व्यक्तिगत निवड असते, तसेच ते सामाजिक मानसिकतेचे दृश्य चिन्हही असतेच. सकच्छ की विकच्छ हा वाद महाराष्ट्रातच लढला गेला होता. आई-वडील हयात असलेल्या पुरुषांनी मिशी उतरवण्याला इथेच आव्हान दिले गेले होते आणि शर्ट-पॅन्ट घालणाऱ्या  मुली उनाड असतात, हा समजही इथेच दीर्घकाळ पोसला गेला. पेहराव बदलत गेला, कारण विचार बदलत गेले.  साडी कशी नेसावी हे शिकवायला घेऊन तरुण पुरुषांनी सोशल मीडियावर व्हायरल होणे महत्त्वाचे आहे ते म्हणूनच !

भुवई उंचावली जाते, कारण... 
वरवर पाहता हे दृश्य बदल काहीसे चटपटीत  वाटले, तरी काही मुलभूत बदलांचे निदर्शन म्हणूनही त्याकडे पाहता येऊ शकते. व्यापक अर्थाने  समाजाच्या दृष्टीकोनात होऊ घातलेल्या बदलांची पहिली चिन्हे अशीच भुवई उंचावायला लावणारी असतात.

Web Title: Men experimenting with how to wear a sari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.