आकाशातून शेतात पडला 'आगीचा गोळा', 18 महिने शोधला; हाती लागला कोट्यवधींचा खजिना!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:35 PM2022-04-15T12:35:28+5:302022-04-15T12:37:19+5:30
या दगडाचं (उल्का) वजन साधारणपणे 1 किलो एवढे आहे आणि किंमत अंदाजे 1 कोटी रुपये एवढी आहे...
आपण अनेकवेळा आकाशातून पृथ्वीवर उल्का पडल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. यातील काही उल्का समुद्रात पडतात तर काही एखाद्या निर्जन भागात पडतात. खरे तर एखाद्याला उल्कापिंडाचे तुकडे सापडणे अत्यंत दूर्मिळ. या खगोलीय दगडांची किंमत कधी-कधी तर कोट्यवधीतही असू शकते. असाच एक खगोलीय दगड सापडल्याने एका ब्रिटिश शेतकऱ्याचे पार आयुष्यच बदलले आहे. हा शेतकरी तब्बल 18 महिन्यांपासून त्याच्या शेतात पडलेल्या या दगडाचा शोध घेत होता. या दगडाचं (उल्का) वजन साधारणपणे 1 किलो एवढे आहे आणि किंमत अंदाजे 1 कोटी रुपये एवढी आहे.
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, नॉर्थ वेल्सच्या रेक्सहॅम येथे राहणाऱ्या 38 वर्षीय टोनी व्हिल्डिंग यांच्या घरावरून एक जळता गोळा गेला आणि तो शेतात गायब झाला. यानंतर टोनी यांनी शोध मोहीम सुरू केली. त्यांची ही मोहीम तब्बल 18 महिने सुरू होती. आता ते सापडलेला हा गोळा सर्टिफाइड करण्याच्या कामात लागले आहे. यानंतरच याची नेमकी किंमत कळू शकेल. यासंदर्भात बोलताना टोनी यांनी सांगितले, की जेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास आपण घराच्या मागे गार्डनमध्ये सिगारेट घेत होतो, तेव्हा सर्वप्रथम हा गोळा पाहिला.
टोनी म्हणाले, ज्यावेळी हा गोळा जमिनीच्या दिशेने येत होता, त्यावेळी मला आकाशात काही तरी चमकत असल्यासारखे वाटले. मी वर पाहिले, तर मला एक आगीचा गोळा अगदी कमी उंचावरून जमिनीच्या दिशेने येताना दिसत होता. यामागे धूरही दिसत होता. हा गोळा एवढा जवळ होता, की मी हवेत फुटबॉलला किक केले असते, तरी तो कदाचित त्याच्यापर्यंत पोहोचला असता. पण हा गोळा जमिनीवर पडल्यानंतर काही सेकंदातच विझला आणि गायब झाला. यानंतर केवळ धूरच दिसत होता.
2014 मध्ये पृथ्वीवर पडली होती सूर्यमालेबाहेरील उल्का -
याच पद्धतीने 2014 मध्येही एक उल्का पृथ्वीवर पडली होती. ही उल्का सूर्यमालेच्या बाहेरील होती. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे अमेरिकन लष्कराने यासंदर्भात माहिती दिली होती. या उल्केचे नाव CNEOS 2014-01-08 असे होते. जानेवारी 2014 मध्ये पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यावर ही उल्का पडली होती.