'कोल्डप्ले' विसरा; या कॉन्सर्टसाठी वेडे झाले होते लोक, विकली गेली होती 35000 तिकिटे...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:27 PM2024-09-26T20:27:51+5:302024-09-26T20:28:46+5:30
Michael Jackson Concert: सध्या भारतात कोल्डप्ले कॉन्सर्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
Michael Jackson Concert: मागील काही वर्षांपासून भारतात अनेक आंतरराष्ट्रीय गायकांच्या लाईव्ह कॉन्सर्ट होत आहेत. यासाठी चाहते वाढीव किमतीवर तिकीट घ्यायला तयार असतात. आता पुढच्या वर्षी 18-19 जानेवारीला मुंबईत जगप्रसिद्ध कोल्डप्ले बँडची कॉन्सर्ट होणार आहे. या ब्रिटिश बँडच्या कॉन्सर्टची क्रेझ इतकी वाढली आहे की, ऑनलाईन तिकिटे येताच साईट क्रॅश झाली. पण, तुम्हाला माहितीये का, कोल्डप्लेच्या आधी एका कॉन्सर्टसाठी चाहते अक्षरशः वेडे झाले होते. त्यावेळी इंटरनेट नव्हते, तरीही शोची सर्व तिकिटे विकली गेली होती.
ही कॉन्सर्ट पॉप किंग मायकल जॅक्सनची होती. मायकल जॅक्शनने भारतात फक्त एकच लाईव्ह शो केला होता. हा शो 1 नोव्हेंबर 1996 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. मायकल मुंबईत आल्यावर विमानतळावर 5000 लोकांनी त्याचे स्वागत केले होते. मायकलला भेटण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकीय नेतेही गेले होते.
विशेष म्हणजे, इंटरनेट आणि डिजिटल युगापूर्वी, कुठलीही तिकीटे लांब रांगेत उभे राहून खरेदी करावी लागायची. त्याकाळी मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टची तिकिटे आल्यावर लोकांनी रांगा लावून खरेदी केली होती. त्याकाळी मायकलच्या कॉन्सर्टमध्ये 35,000 लोक उपस्थित होते. मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टची तिकिटे त्याकाळी स्वस्त नव्हती. आज ज्याप्रमाणे कोल्डप्लेसाठी हजारो रुपये आकारले जातात, त्याचप्रमाणे त्या काळातही कॉन्सर्टची तिकिटे 5000 रुपयांना विकली गेली होती.
मायकल जॅक्सनने फी घेतली नाही
या कॉन्सर्टमध्ये 17 गाणी लाईव्ह सादर करण्यात आली आणि विशेष म्हणजे सरकारने हा शो करमुक्त केला होता. मायकेल जॅक्सनने या कॉन्सर्टसाठी त्याची परफॉर्मन्स फी देखील घेतली नाही आणि शोने 1 मिलियन डॉलर्सचा नफा कमावला होता.