लाखमोलाचे लॉटरी तिकीट कचरापेटीत सापडले...
By admin | Published: January 11, 2017 01:00 AM2017-01-11T01:00:49+5:302017-01-11T01:00:49+5:30
हरवलेले लॉटरी तिकीट कचरापेटीत सापडल्यानंतर ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. या तिकीटाला ६६ हजार पौंड अर्थात ५५ लाखांचे बक्षीस लागले होते
लंडन : हरवलेले लॉटरी तिकीट कचरापेटीत सापडल्यानंतर ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. या तिकीटाला ६६ हजार पौंड अर्थात ५५ लाखांचे बक्षीस लागले होते.
लॉटरी लागल्यामुळे जोआने जॉन्सन आणि डायलान यांचे विवाहाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. डायलान यांनी १५ वर्षांपूर्वी जोआनेला लग्नाची मागणी घातली होती. तथापि, पैशांअभावी त्यांना विवाह करता आला नव्हता. तिकीट सापडल्यानंतर मी डायलानला त्याच्या १५ वर्षांपूर्वीच्या प्रस्तावाची आठवण करून दिली. आम्ही आता धुमधडाक्यात लग्नबेडीत अडकू, असे जोआने हीने म्हटले. मर्सीसाईड येथील रहिवासी असलेली जोआने नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका दुकानात गेली होती. तेथून तिने तीन पौंडाचे स्पॅनिश लॉटरी तिकीट खरेदी केले. मात्र, तिने हे तिकीट तेथेच फेकून दिले होते. नंतर आपल्या तिकीटाला ६६ हजार पौंडाचे बक्षीस लागल्याचे समजल्यानंतर एकीकडे आनंद आणि दुसरीकडे तिकीट गहाळ झाल्याचे दु:ख अशा मिश्र भावनांनी तिच्या ह्रदयात काहूर माजवले.
तिकीट सापडेल या आशेने त्यांनी शोधमोहिम सुरू केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचरापेटीत त्यांना ते सापडले.