इथे जन्माला आली 'बेबी सूमो'; वजन पाहून आई देखील झाली अचंबित!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:06 PM2019-10-14T12:06:06+5:302019-10-14T12:12:09+5:30
प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांचं जन्माला येणारं बाळ सुदृढ, निरोगी आणि सुंदर असावं. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्वच मापदंडाची तपासणी केली जाते.
(Image Credit : Social Media)
प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांचं जन्माला येणारं बाळ सुदृढ, निरोगी आणि सुंदर असावं. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्वच मापदंडाची तपासणी केली जाते. यात जन्माला येणाऱ्या बाळाच्या वजनाचाही समावेश असतो. सामान्यपणे बाळाचं वजन ३ किलो किंवा त्यादरम्यान असतं. मात्र, ऑस्ट्रेलियातील एका बाळाच्या वजनाने स्वत: त्याची आई हैराण झालीये. इतकेच नाही तर बाळाचं वजन पाहून तिने तिच्या बाळाला 'मिनी सूमो रेसलर' असं म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील एका हॉस्पिटलमध्ये २७ वर्षीय इमाने ३८ आठवड्याच्या प्रेग्नेन्सीनंतर ५.८८ किलो वजनाच्या एका सृदृढ मुलीला जन्म दिला. सामान्यपणे ऑस्ट्रेलियामध्ये नवजात बाळाचं सरासरी वजन ३.३ किलोग्रॅम इतकं असतं. पण या मुलीचं वजन सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. या मुलीचं नाव रेमी असून आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहेत.
इमरजन्सी सीझेरियन ऑपरेशननंतर या मुलीचं वजन पाहून हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचारी आणि तिला जन्म देणारी आई सुद्धा अचंबित झाली होती. खरंतर काही दिवसांपूर्वीच अल्ट्रासाउंडच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, बाळाचं वजन साधारण चार किलोच्या आसपास आहे.
इमा आणि तिचा पार्टनर डेनिअल यांना अपेक्षा नव्हती की, मुलीचं वजन वाढून ६ किलो सुद्धा होऊ शकतं. इमाला याआधीही दोन वजनी बाळांना जन्म दिला आहे. इमाचं पहिलं बाळ ३.८ किलो वजनाचं होतं आणि त्यानंतर दुसरं बाळ हे ५.५ किलो वजनाचं होतं.
हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने या मुलीच्या वजनाबाबत सांगितले की, ही मुलगी त्यांच्याकडे जन्माला आलेल्या बाळांपैकी सर्वात जास्त वजनाची होती. इतकेच नाही तर या बाळाला बघण्यासाठी हॉस्पिटलमधील लोकांची गर्दी होत होती. व्यवस्थापनाने सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये साधारण ४० टक्के बाळ हे ३.५ किलो वजनापेक्षा अधिक वजनाचे असतात. पण रेमीचं वजन याच्या १.२ टक्के अधिक आहे.