‘डंख’च्या निमित्ताने मिरॅकल आणि स्मृतिदिन

By Admin | Published: August 7, 2016 02:04 AM2016-08-07T02:04:14+5:302016-08-07T02:04:14+5:30

काळ किती भराभरा जात असतो! ग्रंथसखाचे श्याम जोशी जेव्हा म्हणाले की, ‘जयवंतरावाचे दुसरे पुस्तक प्रकाशित करायचे लक्षात आहे ना?’

Miracle and Memorial Day on the occasion of 'Dakhsh' | ‘डंख’च्या निमित्ताने मिरॅकल आणि स्मृतिदिन

‘डंख’च्या निमित्ताने मिरॅकल आणि स्मृतिदिन

googlenewsNext

- रविप्रकाश कुलकर्णी

काळ किती भराभरा जात असतो! ग्रंथसखाचे श्याम जोशी जेव्हा म्हणाले की, ‘जयवंतरावाचे दुसरे पुस्तक प्रकाशित करायचे लक्षात आहे ना?’
खरे सांगायचे तर श्यामरावांनीच ही गोष्ट लक्षात ठेवून जेव्हा मला सांगितले, तेव्हा सर्वप्रथम मनात आले की, चुनेकर कुटुंबीयांनी विनाअट जयवंतरावांचा समृद्ध ग्रंथसंग्रह ‘ग्रंथसखाकडे’ सुपूर्द केला, तेव्हा त्या दालनात जयवंत चुनेकर दालन असे नाव दिले. हे रितीला धरून झाले. ग्रंथदालनाला त्या ग्रंथप्रेमीचे नाव देऊन स्मृती जागती ठेवण्याचा तो प्रयत्न असतो.
जयवंत चुनेकरांचा पहिल्या स्मृतिदिनाला जयवंतरावांचे कुटुंबीय आप्तेष्ट आणि मित्रमंडळींनी एकत्र येऊन त्यांचं स्मृतिजागरण केले. एवढेच नव्हे, त्या निमित्ताने निवडक जयवंत चुनेकर हा संग्रह देखील प्रकाशित केला. अर्थात, असल्या पुस्तकांना व्यावसायिक मूल्य नसते हे उघडच आहे आणि आता श्याम जोशींनी निवडक जयवंत चुनेकर खंड दोनचा प्रस्ताव पुढे मांडला. म्हणजे, श्यामरावांनी जयवंतरावांच्या पहिल्या स्मृतिदिनाला जे म्हटले होते की, असाच दुसरा खंड पुढल्या वर्षी प्रकाशित होईल, तो शब्द त्यांनी आठवणीतच ठेवत नव्हे, तर पाळला आहे. या गोष्टीला आता एक वर्ष झाले आहे. याचीदेखील आठवण श्याम जोशींनी मला करून दिली आहे.
काळ कसा भराभर जातो, असे मी सुरुवातीला मी म्हटले ते या अर्थाने!
पण काळ हळू पण जात नसतो की वेगाने, तो त्याच्या ठरलेल्या पद्धतीने अनंत काळ जातो आहे आणि पुढेही जाईल. जीवलगाचा मृत्यू म्हणजे काय होते, तर तो शेजारच्या खोलीत गेलेला असतो. तो दिसत नाही की, आपल्याशी बोलत नाही, पण आपण मात्र बोलू शकतो. शेवटी आपले आपणच समाधान करायला हवे का? हा सदुपदेश अनंत काणेकरांनी जयवंत दळवींना केला होता, जेव्हा दिनानाथ दलालांच्या जाण्याने ते बेचैन झाले होते तेव्हा. आधी काणेकर गेले, मग दळवीही गेले, पण एकाचा समुपदेश दुसऱ्याला घ्यायला काय हरकत आहे? जयवंत चुनेकरांची आठवण ते गेल्यावर किती निमित्तांनी कित्येकांना झाली?
पिंपरी-चिंचवड येथे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने अभूतपूर्व असे झाले. त्या गर्दीच्या संमेलनातील ग्रंथदालनातून हिंडत असता, अकस्मात चांगदेव काळे समोर आले आणि म्हणाले, ‘रविप्रकाश, अशा ग्रंथदालनातच चुनेकरांची आपल्याला भेट होते... नाही?’ पुढे त्यांना बोलवेना, पण क्षणभर मलादेखील काय बोलावे हे उमजेना.
पण आम्हा दोघांना न बोलतादेखील काय बोलायचे आहे हे कळले होते.
असे प्रसंग पुढेही येत गेले. अजूनही येतात. प्रतिनिधिक म्हणून काही प्रसंग सांगतो-
मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या सहकार्याने जयवंत चुनेकर आणि सुहास लिमये यांनी इंग्रजीतून सहज-सोप्या पद्धतीने समजावे, अशा पद्धतीने माय मराठी भाग १ तयार केला, पण दुर्दैवाने या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आदल्या रात्रीच जयवंतरावांचे निधन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन आमीर खान याच्या हस्ते झाले. कारण त्याने या उपक्रमात भरभरून मदत केली होती. त्याने या पुस्तकाची उपयुक्तता स्पष्ट केली. तेदेखील मराठीतून आणि त्याच वेळी चुनेकर जाण्याचे दु:खदेखील... या प्रकल्पाचे पुढे काय झाले?
मध्यंतरी आकस्मिकपणे सुहास लिमये दिसले. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या तंद्रित होते. मनात आले, त्यांना विचारावे मात्र मराठीचे पुढे काय?
पण आमीर खानलामराठी शिकवताना हे लिमये फटकवायला मागे पुढे पाहत नाहीत, असे आमीरनेच म्हटले आहे. तेच लिमये ‘तुम्हाला विचारायला काय जाते? जयंत चुनेकर सोडा, त्यांच्यासारखा थोडासा असले तरी चालेल. कुणी सहकारी देता का? असे विचारले, तर काय उत्तर देणार,’ असे वाटून मीच गप्प झालो.
पण प्रश्न कायम आहे. मात्र, मराठीचा पुढच्या भागाचे काय?
मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार म्हणतात, ‘जयवंतराव गेल्यामुळे माझी एक बाजू निकामी झाल्यासारखे वाटते. इतकी ते माझ्याबरोबर असण्याची मला सवय झाली होती...’
साहित्य संघातर्फे अमराठी लोकांना मराठी शिकवण्याचे वर्ग चालविले जातात, त्यात जयवंतरावांचा वाटा मोठा होता. त्यांच्याच एक सहकारी सुहासिनी किर्तीकरांची प्रतिक्रिया अशीच हळहळती आहे.
अंबरनाथ येथे फिल्म सोसायटी सुरू होत आहे. त्यासाठी जयवंतराव उत्कृष्ट चित्रपट जे पाहिलेच पाहिजेत, दाखवले पाहिजेत, अशांची यादी देणार होते, पण ते राहिलेच. जयवंतरावांची अशा विविध संस्थांची व्यक्तिंची गुंतवणूक ही अशी होती. प्रत्येकाला जयवंतरावांच जाणं लागून राहिले, हेच खरे...
आता माझ्या बाजूने थोडेसे -
एक दिवस जयंवतरावांनी इयान फ्लेमिंगकृत ‘यू ओन्ली लिव्ह टष्ट्वाइस’ च्या मराठी अनुवादाचे पुस्तक हातात ठेवले. जेम्स बाँडचे चित्रपट आल्यानंतर इयान फ्लेमिंग आणि त्याच्या बाँड कादंबऱ्यांना मागणी वाढली. त्या काळात मूळ कादंबरी वाचली होती, पण भाषांतर कसे केले आहे, याची उत्सुकता असतेच, म्हणून पुस्तकाचे पान उघडले तर त्यावर अनुवाद-जयवंत चुनेकर हे नाव...! आमच्या बोलण्यात हा विषय कधी आलाच नव्हता, आश्चर्य वाटलेच. अर्थात, अनुवाद वाचनाला दोन गोष्टींनी लक्ष वेधले. एक म्हणजे, कथानकातील काही संदर्भांचे त्यांनी केलेल्या स्पष्टीकरणात्मक नोंदी, ज्यामुळे अनेक गोष्टींचे लागेबांधे कळण्यास मदत होत होती. उदा. अर्न्स्ट स्टावदी ब्लोफेल्ड याचा उल्लेख येतो. नशिबाच्या दीर्घ बळकट दोराचा फास त्यात त्यांच्यापर्यंत घेऊन आला होता! नेमक्या या लोकांपर्यंत ! नेमके त्यालाच!
पटकन हा संदर्भ लक्षात येत नाही, पण चुनेकरांची त्याबाबत नोंद आहे. ‘फ्लेमिंगच्या थंडरबॉल आणि आॅल हर मॅजेस्टिज सिक्रेट सर्व्हिस या दोन बाँड कथांत हा पुरुष मुळात अवतरतो. यापैकी दुसऱ्या कादंबरीत बाँडच्या पत्नीच्या (लग्न झाल्यावर काही तासातच) मृत्यूची घटना येते, जिचा संदर्भ या कादंबरीत आहे. हा मृत्यू ब्लोफेलने घडवून आणला असल्याने बाँडच्या मनात त्याचा सूड उगवण्याची प्रबळ भावना धगधगत आहे.’
चुनेकरांचा हा विशेष त्यांच्या पुढच्या ‘द सिपीआॅल चेंबर (मूळ लेखक स्टीव्ह मार्टिनी) कादंबरीच्या अनुवादातदेखील दिसतो. आता हे सगळे सांगायचे कारण चुनेकरांची पहिली अनुवादित कादंबरी आयविग बॅलसची ‘द मिरॅकल’ होती, पण मला ती वाचायला मिळालीच नव्हती. पुढे ती अप्राप्यदेखील झाली.
किती अप्राप्य? तर या कादंबरीची दुसरी आवृत्ती मेहता पब्लिसिंग हाउसतर्फे काढायची ठरली, तेव्हा त्यांच्याकडेच प्रत नव्हती! ती त्यांना दिली जयवंतरावांचे नात्याने काका, पण त्याहीपेक्षा मित्र, समविचारी वगैरे असे अधिक काही असणाऱ्या डॉ. सु. रा. चुनेकरांनी!
आता ‘द मिरॅकल’ची दुसरी आवृत्ती आली खरी, पण तो आनंद पाहायला जयवंतराव नाहीत. त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाची जुळवाजुळव करताना, डॉ. सु. रां. चुनेकरांनी जयवंतरावांची पूर्वी हंस मोहिली नवल च्या संयुक्त अंकात प्रसिद्ध झालेली ‘डंख’ही रहस्यमय कादंबरी उपलब्ध करून दिली. ती आता ग्रंथसखाचे श्याम जोशी प्रकाशन करत आहेत.
या निमित्ताने पुन्हा एकदा जयवंतरावांसंबंधात स्मृतिकल्लोळ जागा होईल. स्मृतिदिनाचा हाच हेतू असतो!

Web Title: Miracle and Memorial Day on the occasion of 'Dakhsh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.