मिस लाँग हेअर तिच्या लांबसडक केसांनी झाकते आपलं शरीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 04:44 PM2017-10-12T16:44:49+5:302017-10-12T17:11:15+5:30
लंडनमधील एका तरुणीचे केस एवढे लांब आणि घनदाट आहेत की त्याने ती तिचं संपूर्ण शरीर झाकून घेऊ शकते.
लांब-सडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र एवढ्या लांब केसांची निगा राखणंही तेवढंच अवघड असतं. त्यामुळे केस वाढवण्याच्या भानगडीत फार कमी स्त्रिया पडतात. पण तुम्हाला माहितेय का लंडनमधील एका तरुणीचे केस एवढे लांब आणि घनदाट आहेत की त्याने ती तिचं संपूर्ण शरीर झाकून घेऊ शकते.
लंडनमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीचं नाव आहे मॅलगोरजाता (३२). वयाच्या सातव्या वर्षापासून तिनं केस वाढवणं सुरु ठेवलंय. यासाठी ती नियमित केस कापतही होती. जेणेकरुन केसांना योग्य वाढ आणि आकार मिळेल. केसांच्या निगराणीसाठी ती घरगुती व नैसर्गिक साधनांचा वापर करते. केस धुण्याआधी डोक्याला नारळाच्या दुधाने मालिश करते आणि मग अर्ध्या तासात केस धुवून अंघोळ करते.
केसांची ठराविक वाढ झाल्यानंतर मात्र तिने केस कापणं बंद केलं. जवळपास २०१५ पासून तिने केस कापले नसल्याचं ती सांगते. तिचे केस तब्बल सात फुट लांब असून ते तिच्या पायांच्या तळव्यांपर्यंत पोहचतात. या घनदाट केसांमुळे ती स्वतःचं संपूर्ण शरीरही झाकून घेऊ शकते. शिवाय मैलगोरजाता म्हणतात की ,‘या लांब केसांमुळे मी लोकांच्या कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरते.’
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी तिच्या केसांचे फोटो टाकत असते. तिच्या अकाउंटचं नावही ‘मिस लाँग हेअर’ असं आहे. वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून किंवा प्रयोग करून ती ते फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असते. मुळातच सुंदर असलेल्या तिला या दाट केसांमुळे चार चाँद लागले आहेत, हे काही नव्याने सांगायला नको.