अडीच वर्षापासून बेपत्ता व्यक्तीला स्कॉर्पिओ बक्षिस मिळाली; कंपनीनं कुटुंबाला पत्र पाठवलं
By प्रविण मरगळे | Published: December 15, 2020 11:56 AM2020-12-15T11:56:48+5:302020-12-15T11:58:13+5:30
या पत्रात पवन कुमारला कुपन लागल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचं समजताच आई-वडिलांना आनंद झाला.
...याला नशीब म्हणायचं की आणखी काय, जो व्यक्ती गेल्या अडीच वर्षापासून घरातून बेपत्ता होता, त्याच्या नावावर बक्षिस म्हणून महिंद्रा स्कॉर्पियो लागली आहे. बेपत्ता व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नाही परंतु तो जिवंत असल्याचा पुरावा कुटुंबाला मिळाला. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे.
सोलन जिल्ह्यातील ग्राम पंचायत पलोगच्या नेर गावातून बेपत्ता असणाऱ्या पवन कुमार यांच्या घरी औषध कंपनीकडून एक पत्र मिळालं, हे पत्र वाचून बेपत्ता मुलाच्या आई-वडिलांना पुन्हा आस लागली आहे. पवन कुमारने एका औषध कंपनीतून औषध खरेदी केलं होतं, कंपनीकडून मिळालेल्या कुपनमध्ये पवन कुमारला महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली.
पवन कुमार यांचे वडील नंदलाल शर्मा म्हणाले की, जवळपास अडीच वर्षापूर्वी पवन कुमार घरात संध्याकाळी परततो असं सांगून निघून गेला तो पुन्हा कधीच परतला नाही. त्यादिवसापासून पवन कुमार घरातून बेपत्ता आहे. पवन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. काही दिवसांपूर्वी औषध कंपनीकडून पवन कुमार यांच्या घराच्या पत्त्यावर एक पत्र आलं, हे पत्र वाचून आई-वडिलांना मोठा आनंद झाला.
या पत्रात पवन कुमारला कुपन लागल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचं समजताच आई-वडिलांना आनंद झाला. कुटुंबाने कंपनीच्या अधिकाऱ्यांची संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, पवन कुमार यांनी अडीच महिन्यांपूर्वी औषधं खरेदी केली होती. त्यावेळी मिळालेल्या कुपनमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली. पवन कुमार यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर बक्षिस कंपनीकडून मिळणार आहे.
दरम्यान, औषध कंपनीकडून आलेल्या पत्रानंतर पवन कुमार यांचा शोध घेण्यात मदत मिळणार आहे, संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून, लवकरात लवकर पवन कुमार यांचा ठावठिकाणा सापडण्यात यश मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे डीएसपी प्रताप सिंह यांनी व्यक्त केला आहे.