...अन् डॉक्टर आमदाराने अनेक किमी पायपीट करुन सीमेवरील सुरक्षा जवानाचे प्राण वाचवले!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 01:35 PM2020-06-23T13:35:14+5:302020-06-23T13:35:45+5:30
ड्युटी पोस्टपर्यंत एका वाहनाने थियमसांगा पोहचले मात्र त्यानंतर वाहनाने नदी पार करणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक किमी पायपीट करावी लागली
नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात सध्याच्या घडीला डॉक्टर हे देवदूतासारखे काम करत आहे, आपला जीव धोक्यात घालून अनेकदा डॉक्टर रुग्णांची सेवा करत असतात. रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील असतात त्यामुळे डॉक्टरांना नेहमी देवाच्या रुपाने पाहिलं जातं. मिजोरममध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे त्यात आमदार झेड आर थियमसांगा यांच्या कृत्याने पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
भारत-म्यानमार सीमेवर एका सुरक्षा जवानाची तब्येत बिघडली होती, त्या जवानाला तात्काळ उपचारांची गरज होती, त्यावेळी आमदार झेड आर थियमसांगा यांनी नदी पार करत अनेक किमी पायपीट करत आपल्या डॉक्टरकीचं कर्तव्य पार पाडलं. थियमसांगा हे पेशाने डॉक्टर आहेत, २०१८ च्या निवडणुकीत ते मिजोरममध्ये आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी नियमित डॉक्टरकी प्रॅक्टिस सोडली. मात्र आजही ते दुर्गम भागात कोणाची तब्येत बिघडली तर ते तातडीने त्याठिकाणी उपचारासाठी पोहचतात.
भारत म्यानमार सीमेवर शनिवारी भारतीय रिजर्व बटालियनमधील एका कर्मचाऱ्याच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. याची माहिती आमदार थियमसांगा यांना लागताच ते आपल्या डॉक्टर मुलीसोबत त्याठिकाणी जाण्यास निघाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा जवान कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सीमावर्ती भागात तैनात होता. पीटीआयशी बोलताना थियमसांगा यांनी सांगितले की, त्यांना एका सुरक्षा जवानाच्या पोटात खूप दुखत असल्याची माहिती मिळाली, त्याला तात्काळ उपचाराची गरज असल्याचं सांगण्यात आलं.
Dr ZR Thiamsanga, MLA, on his visit to Indo-Myanmar border police duty camp at Tiau (Tio River), treated one IR policeman who is suffering from acute stomach ache. The policeman has since been moved to Champhai for further treatment pic.twitter.com/x32Q9OgVDD
— DIPRMizoram (@dipr_mizoram) June 21, 2020
ड्युटी पोस्टपर्यंत एका वाहनाने थियमसांगा पोहचले मात्र त्यानंतर वाहनाने नदी पार करणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक किमी पायपीट करावी लागली. सुरक्षा जवानाची तपासणी केली असता सुदैवाने त्याच्या पोटात गंभीर काही नव्हते. प्राथमिक उपचारानंतर त्याला चम्फाई येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. आमदार थियमसांगा हे कोविड १९ साठी सरकारकडून गठीत केलेल्या आरोग्य समितीचे अध्यक्षही आहेत. थियमसांगा नेहमी त्यांच्यासोबत औषधे आणि त्यांची उपकरणे बाळगतात. गरीब, विशेषत: ग्रामीण भागात गरजू रुग्णांसाठी तात्काळ मदत करणे त्यांची जबाबदारी आहे असं थियमसांगा सांगतात.
थियामसांगा यांनी १९८५ मध्ये इंफळच्या प्रादेशिक वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि १९९५ मध्ये एमडी डीग्री प्राप्त केली. त्यांनी २०१८ मध्ये मिझो नॅशनल फ्रंटमधून निवडणूक लढविली आणि कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार टीटी जोथमसांगा यांना पराभूत केले. थियामसांगा राज्य राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत.