माकडानं प्राणी संग्रहालयातून लावला पोलिसांना फोन, कारण समजताच पोलिसांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 06:48 PM2022-08-19T18:48:22+5:302022-08-19T18:53:27+5:30

फोनवर त्या माकडानं 911 हा क्रमांक डायल केला. पोलिसांना फोन गेल्यानंतर ते धावतपळत घटनास्थळी आले. पण तिथं आल्यावर माकडानं फोन लावल्याचं कळताच पोलिसही चकित झाले.

monkey called police from zoo shocked police reached location | माकडानं प्राणी संग्रहालयातून लावला पोलिसांना फोन, कारण समजताच पोलिसांना बसला धक्का

माकडानं प्राणी संग्रहालयातून लावला पोलिसांना फोन, कारण समजताच पोलिसांना बसला धक्का

Next

‘माकडाच्या हाती कोलीत’ ही म्हण बरीच प्रचलित आहे. पण अमेरिकेतील कॅलिफोर्नियात (California) असणाऱ्या एका प्राणिसंग्रहालयातील (Zoo) माकडाच्या हाती फोन लागल्यानंतर त्यानं तर चक्क पोलिसांनाच कामाला लावलं. फोनवर त्या माकडानं 911 हा क्रमांक डायल केला. पोलिसांना फोन गेल्यानंतर ते धावतपळत घटनास्थळी आले. पण तिथं आल्यावर माकडानं फोन लावल्याचं कळताच पोलिसही चकित झाले. ‘टीव्ही 9 हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

जंगलातून शहरात येत सर्वत्र उच्छाद मांडणाऱ्या माकडांच्या टोळ्या आपण खूपदा पाहिल्या असतील. बऱ्याचवेळा तर त्यांना आवर घालण्यासाठी वन विभागाला पाचारण करावं लागतं. पण त्यांचा त्रास कमी होत नाही. अशाच एका छोट्याशा माकडानं कॅलिफोर्निया पोलिसांना हैराण करून सोडलं. त्याचं झालं असं की, प्राणिसंग्रहालयात माकडाच्या हाती फोन लागला. त्यानं चक्क तेथील पोलिसांचा क्रमांक 911 डायल केला. पोलिसांनीही तो कॉल उचलला; पण समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. बऱ्याच वेळानंतर फोन कट झाला. पोलिसांनी आलेल्या क्रमांकावर कॉल बॅक केला. परंतु, फोन कोणीही उचलत नव्हतं. त्यामुळे कुणाला तरी तातडीची मदत लागते की काय? असा विचार करून पोलिसांनी फोनचे लोकेशन शोधलं, तेव्हा तो कॉल एका प्राणिसंग्रहालयातून आल्याचं कळलं. प्राणिसंग्रहालयात व्यक्ती अडकल्याची शक्यता पोलिसांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी तातडीनं पावलं उचलली व ते काही वेळातच तिथं पोहोचले. कॉलबाबत पोलिसांनी प्राणिसंग्रहालयात विचारणा केली तेव्हा सगळा प्रकार समोर आला.

सोशल मीडियावर या घटनेचा सर्व तपशील शेरीफ कार्यालयाच्या वतीनं दिला गेला आहे. ज्या माकडाने पोलिसांना फोन केला त्याचा फोटोही या पोस्टमध्ये आहे. यात म्हटलं आहे की, कॅपुचिन माकडं (Capuchin Monkeys) अत्यंत जिज्ञासू वृत्तीची असतात. एखादी वस्तू हाती लागली की ते त्याची पूर्ण पडताळणी करतात. त्या माकडानंही असंच काहीसं केलं आणि 911 क्रमांक डायल करून पोलिसांना प्राणिसंग्रहालयात बोलावून घेतलं.

नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
प्राणिसंग्रहालयात गेल्यानंतर पोलिसांना आलेला अनुभव फेसबुकवर शेअर करण्यात आला. यात त्या माकडाचा फोटो शेअर करून मजकूर लिहिला गेला होता. यावर लोकांनी मजेशीर कमेंट केल्या. एका युजरने कमेंटमध्ये लिहिताना फोनमध्ये 911 डायल करण्यासाठी कुठले नवीन फंक्शन तर आले नाही ना? असा प्रश्न विचारला. एकाने तर त्या माकडाला प्रेमाने ‘इवल्याशा मूर्ख माकडा…’ असं म्हटलंय. एखाद्या हिरोप्रमाणे तू देशभरात प्रसिद्ध झाल्याचं दुसऱ्या एका युजरने लिहिलं.

दरम्यान, जंगलातील हुशार प्राण्यांपैकी एक म्हणून माकडांना ओळखलं जातं. माकडं बरीच खोडकरही असतात. त्यांच्या मर्कटलीलांचा अनेकांना त्रासही होतो. त्याचवेळी त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीही वाखणण्याजोगी असते. टोळ्यांनी फिरणारी माकडं तितकीच भावनिकही असतात.

Web Title: monkey called police from zoo shocked police reached location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.