चंद्र चोरतोय पृथ्वीचे पाणी, अमेरिकी संशोधन अहवालात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 07:55 AM2022-05-06T07:55:51+5:302022-05-06T07:56:11+5:30
चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांमध्ये वेगवेगळी मते आहेत.
वॉशिंग्टन : चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाबाबत शास्त्रज्ञांमध्ये वेगवेगळी मते आहेत. परंतु एका संशोधनानुसार चंद्रावर पाणी पृथ्वीवरूनच पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. अब्जावधी वर्षांपासून चंद्र पृथ्वीच्या वातावरणातील पाणी बर्फाच्या रूपात साठवत आहे. अमेरिकेतील अलास्का फेअरबँक्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, चंद्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातून जात असताना पाणी बनवणारे आयन (ऑक्सिजन आणि हायड्रोजन) खेचतो. हे आयन एकत्र होऊन चंद्रावर बर्फ तयार होतो.
चंद्रावरील पाण्याबाबत आणखी एक सिद्धांत म्हणून या संशोधनाची भर पडली आहे. भविष्यात जेव्हा मानव चंद्रावर वसाहती बनवेल, तेव्हा हा बर्फ त्यांच्यासाठी पाण्याचा एकमेव स्त्रोत असेल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.
चंद्रावर ८४० घन मैल पाणी असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.
चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर बर्फरूपात हे पाणी स्थित आहे.
अमेरिकेतील हुरॉन सरोवर भरण्यासाठी हे पाणी पुरेसे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.