मुख्यमंत्री साहेब, नवरा कचरा साठवतोय! बायकोनं मांडली व्यथा अन् सापडला ८ ट्रॉली कचरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 04:26 PM2022-01-13T16:26:26+5:302022-01-13T16:27:31+5:30
मुख्यमंत्री साहेब, नवरा छतावर कचरा जमा करतोय; मदत करा! बायकोनं मांडली व्यथा अन् सापडला आठ ट्रॉली कचरा
भोपाळ: एमपी अजब है, सबसे गजब है म्हणतात. त्याची प्रचिती देणारा प्रकार मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये घडला आहे. एका व्यापाऱ्यानं त्याच्या तीन मजली घरावर कचरा साठवून ठेवला होता. कचरा जमवण्याचा छंद असल्यानं व्यापाऱ्यानं छतावर कचरा गोळा केला. कचऱ्याच्या दुर्गंधामुळे शेजारी आणि कुटुंबीय त्रासले. व्यापाऱ्याची पत्नीनं याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाच्या हेल्पलाईनकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर कारवाई झाली.
मुरैनाचे रहिवासी असलेल्या योगेश गुप्ता यांना कचरा गोळा करण्याचा छंद आहे. ते पेशानं व्यापारी आहेत. त्यांच्या घरातून अनेक टन कचरा काढण्यात आला. त्यामुळे मुख्य बाजारातील गल्ली भरली. त्यांच्या घराच्या छतावर कचऱ्यानं भरलेल्या टाक्या आढळल्या. व्यापाऱ्याचा छंद पाहून लोक चकीत झाले. गुप्ता इतका कचरा गोळा करून काय करतात, असा प्रश्न स्थानिकांना पडला.
साधारणपणे लोकांना पैसे, दागिने, कपडे गोळा करण्याचा छंद असतो. मात्र कपड्याचे व्यापारी असलेले गुप्ता यांना कचरा गोळा करण्याची आवड आहे. त्यांच्या घरात ८ ट्रॉली कचरा सापडला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कचरा बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी एक संपूर्ण गल्ली कचऱ्यानं भरली. गुप्ता सदर बाजारात वास्तव्यास आहेत.
योगेश यांच्या घराच्या छतावर प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये, कॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात कचरा सापडला. विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांच्या पत्नीनंच तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून तिनं मदत मागितली होती. गुप्ता यांच्या शेजाऱ्यांना कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रास व्हायचा. शेजाऱ्यांनी अनेकदा यावरून गुप्ता यांनी सांगून पाहिलं. मात्र त्यांच्यासोबत गुप्ता वाद घालायचे.