चोरी झाली दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली, किंमत ऐकुन व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 12:16 PM2018-01-05T12:16:44+5:302018-01-05T12:22:07+5:30
डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली आहे.
कोपनहेगन- डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमधून दुनियेतील सर्वात महागडी वोडक्याची बाटली चोरीला गेली आहे. कोट्यवधी किंमतीची हिरे, सोने-चांदींनी ही बाटली मढवली गेली होती. कोपनहेगनमधील बारमध्ये ही बाटली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पण, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ही बाटली चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. वोडक्याच्या बाटलीची किंमत १.१ मिलियन युरो म्हणजे जवळपास साडेआठ कोटी रुपये इतकी आहे.
ही बाटली तयार करण्यासाठी तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदीचा वापर करण्यात आला होता. ‘माँट कार्लो कार रॅली’साठी तयार करण्यात आलेला चामड्याच्या बॅच या बाटलीच्या मध्यभागी होता. अत्यंत वैशिष्ट्पूर्ण पद्धतीनं ही बाटली घडवली होती, त्यामुळे ही सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरली. विशेष म्हणजे या बाटलीच्या कॅपमध्ये हिरे मढवले होते. 1912 च्या खास चामड्याचा बॅच या बाटलीला लावण्यात आला होता. जगभरात गाजलेल्या ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ या टीव्ही सिरिजमध्येही ही बाटली दाखवण्यात आली होती. कोपनहेगनमधील ‘कॅफे 33’ या बारमध्ये ही बाटली गेल्या काही महिन्यांपासून ठेवण्यात आली होती. रशियातील महागड्या आणि अलिशान कार आणि वोडका तयार करणाऱ्या ‘डार्ट्झ फॅक्टरी’तून बाटली आणली होती.
रात्री बार बंद झाल्यानंतर चोर बारमध्ये शिरला आणि त्यानी ही बाटली चोरली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सध्या पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.
रात्री बार बंद असताना चोर बारमध्ये शिरला. भिंत तोडून चोर आत शिरला असावा, असा अंदाज बारचे मालक इंगबर्ग यांनी व्यक्त केला आहे. चोरीच्या घटनेचं मला फार दुःख झालं आहे. वोडक्याची बाटली इतर मद्याच्या बाटल्यांपेक्षा सरस होती. माझ्याकडे एकुण 1200 मद्याच्या बाटल्या आहेत पण चोरीला गेलेली बाटली सगळ्यात खास होती, असंही ते म्हणाले.