'या' देशात सात अपत्यांना जन्म दिला तर आईला दिलं जातं गोल्ड मेडल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:55 PM2019-11-05T12:55:01+5:302019-11-05T12:58:39+5:30
इथे एखाद्या महिलेने सहा अपत्यांना जन्म दिला तर तिला कांस्य पदक दिलं जातं. तर सात अपत्यांना जन्म दिला तर त्या महिलेचा सुवर्ण पदकाने सन्मान केला जातो.
(Image Credit : BBC)
अनेक देशांमध्ये सरकार नागरिकांना जास्त अपत्य झाल्यावर आर्थिक मदत करतात. पण कझाकस्तान याबाबतीत दोन पावले पुढे मानला जातो. कझाकस्तानमध्ये मोठ्या परिवाराला प्रोत्साहन दिलं जात आहे. येथील सरकारचं धोरण आहे की, येथील परिवारात जास्तीत जास्त अपत्ये असावीत. त्यासाठी या देशात जन्म दर वाढवण्यासाठी जन्मदात्या महिलांना 'हिरो मदर्स' मेडल दिलं जातं..
इथे एखाद्या महिलेने सहा अपत्यांना जन्म दिला तर तिला कांस्य पदक दिलं जातं. तर सात अपत्यांना जन्म दिला तर त्या महिलेचा सुवर्ण पदकाने सन्मान केला जातो. पदक मिळणाऱ्या महिलांना आयुष्यभर मासिक भत्ताही मिळतो.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, कझाकस्तानमध्ये राहणारी रौशन कोजोमकुलोवा ही १० मुलांची आई आहे. तिच्याकडे कांस्य आणि सुवर्ण पदक आहेत. तिच्या घरात आठ मुली आणि दोन मुलं आहेत. जेवणाला सगळे एकत्र बसतात. सर्वात लहान मुलाला मोठा भाऊ जवळ घेऊन बसतो. कोजोमकुलोवा तिला मिळालेले मेडल टी-शर्टवर लावून दाखवते.
बक्तीगुल हलायकबेवाला सहा अपत्य आहेत. तिला सिल्व्हर मेडल मिळालं आणि सरकारकडून दर महिन्याला भत्ता मिळतो. ती सांगते की, 'काही लोक जास्त अपत्य होऊ देण्यास घाबरतात. कारण सरकार केवळ पहिल्या वर्षीच त्यांची मदत करतात. हे कारण असू शकतं. तिला महिन्याला १ लाख ४४ हजार रूपये मिळतात. ज्याने तिचं घर चांगलं चालतं.
मातांना पदकाने सन्मानित करण्याची आणि आर्थिक मदत देण्याची प्रथा सोव्हिएत संघावेळी सुरू करण्यात आली होती. १९४४ मध्ये सोव्हिएत संघाने 'मदर हिरोईन' पुरस्काराची सुरूवात केली होती. हा त्या परिवारांना दिला जात होता, ज्या घरात १० पेक्षा अधिक अपत्ये आहेत.
जन्म दर जास्त ठेवणे ही कझाकस्तान सरकारची प्राथमिकता आहे. हिरो मदर होण्यासाठी आता कमीत कमी चार अपत्ये असणे गरजेचं आहे. सरकार गर्भवती आणि एकट्या आईलाही आर्थिक मदत देते. पण केवळ पहिल्या वर्षी. ज्या मातांना चारपेक्षा कमी अपत्य आहेत, त्यांना सरकारकडून मासिक भत्ता मिळत नाही.