मुलगा गर्लफ्रेंडवर उडवत होता पैसे, आईने शिकवला धडा; कोर्टात खेचलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:05 PM2023-10-30T12:05:28+5:302023-10-30T12:06:02+5:30
पतीपासून घटस्फोट घेतल्यापासून मुलाच्या भविष्याबाबत ती इतकी चिंतेत होती की, त्याच्यासाठी बरेच पैसे जमा करून ठेवले होते.
प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांनी आपल्या मुलांना सगळं काही द्यावं जे त्यांना हवं. अनेकद या इच्छा पूर्ण करताना त्यांच्या लक्षातही येत नाही की, मुलं बिघडली आहेत. असंच काहीसं एका आईसोबत झालं. आपला मुलगा खूप शिकेल असं स्वप्न तिने पाहिलं होतं, पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. ही घटना चीनमधील आहे. पण सगळ्याच पालकांसाठी महत्वाची आहे.
साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या सिचुआन प्रांतात राहणाऱ्या महिलेने आपल्या मुलाला एकटीने सांभाळलं होतं. पतीपासून घटस्फोट घेतल्यापासून मुलाच्या भविष्याबाबत ती इतकी चिंतेत होती की, त्याच्यासाठी बरेच पैसे जमा करून ठेवले होते. पण तिला कुठे माहीत होतं की, आपली घामाची कमाई तिचा मुलगा एक दिवस आपल्या गर्लफ्रेंडवर उडवेल.
गर्लफ्रेंडवर उडवले आईचे पैसे
41 वर्षीय महिलेचा मुलगा 19 वर्षाचा आहे. तो लहान असतानाच आई वडिलांपासून वेगळी झाली होती आणि तिने एकटीने मुलाला मोठं केलं. जेव्हा महिला दुसरं लग्न करणार होती तेव्हा तिने तिची 5 लाख युआन म्हणजे 56 लाख रूपये इतकी रक्कम मुलाच्या नावे केली. जेणेकरून पतीला ते पैसे द्यावे लागू नये. तिने मुलाला सांगितलं की, पैसे त्याच्या विदेशातील शिक्षणासाठी आहेत. तो कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याने आईने जमा केलेले पैसे गर्लफ्रेंडवर उडवणं सुरू केलं. तेही आईच्या लपून.
आईने खेचलं कोर्टात
जेव्हा आईला बॅंकेतून समजलं की, त्यांच्या मुलाने पासबुक हरवल्याची तक्रार केली आहे, तेव्हा तिला धक्का बसला. मुलाने पासबुक हरवल्याचं सांगून नवीन पासवर्ड घेतला होता आणि सगळे पैसे काढले होते. यातील 21 लाख रूपयातून त्याने गर्लफ्रेंडला नवीन कार घेऊन दिली होती. तिच्यासोबत फिरायला गेला. जेव्हा आईने त्याला बाकीचे पैसे मागितले तर त्याने देण्यास नकार दिला. अशात आईने मुलाविरोधात कोर्टात केस केली. कोर्टाने महिलेला पैसे परत मिळवून दिले. तर महिला मुलाचा शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च देण्यास सहमत झाली.