कन्येला न्यायाधीश बनविण्यासाठी वैशाली करते चक्क लोकांची ‘हजामत’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 09:16 AM2022-03-08T09:16:15+5:302022-03-08T09:16:57+5:30
दाढी, कटिंग करण्याचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या कुटुंबात वाढलेल्या वैशाली दामोदर मोरे या महिलेचा सुमारे २१ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत दाढी कटिंग मुंडण वगैरे करणे पुरुषांची मक्तेदारी होती; परंतु या परंपरेला छेद देत पुरुषांपेक्षा आपणही कमी नाही हे त्र्यंबकेश्वर येथील वैशाली मोरे या महिलेने दाखवून दिले आहे. आज एकुलत्या मुलीला स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी तसेच न्यायाधीश बनविण्यासाठी चक्क सलूनच्या माध्यमातून लोकांची हजामत करण्याचा व्यवसाय थाटला आहे.
दाढी, कटिंग करण्याचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या कुटुंबात वाढलेल्या वैशाली दामोदर मोरे या महिलेचा सुमारे २१ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. एकुलती मुलगी एक वर्षाची असल्यापासून या माय-लेकीचा सांभाळ भाऊच करीत होते. मुलीला स्वतःच्या पायावर उभी करण्याचा ध्यास मनात होता. त्यामुळे तरुण असूनही पुनर्विवाहाचा विचारदेखील केला नाही. भावांचे कुशावर्त तीर्थासमोर सलून व्यवसायाचे दुकान आहे आणि त्या दुकानासमोर वैशाली नारळ, प्रसादाचे दुकान टाकून खारीचा वाटा उचलत होती. मुलीचे शिक्षण व घरखर्च तुटपुंज्या कमाईत भागविणे केवळ अशक्य होते. आपण परित्यक्ता आहोत म्हणून आई, वडील व भाऊ यांची साथ असली तरी एकत्र कुटुंबाला आपलाही हातभार असावा यासाठी वैशालीने अनेक सिझनेबल व्यवसाय केले. ते करीत असताना आपण दाढी, कटिंगचा व्यवसाय का करू नये. आपला पिढीजात व्यवसाय फक्त पुरुषांनी का करावा, असे प्रश्न तिच्या मनात उपस्थित झाले. पुरुषांच्या या मक्तेदारीला छेद देत वैशाली दामोदर मोरे ही महिला दोन-तीन वर्षांपासून आपल्या भावांसोबत नारायण नागबलीसारख्या विधीत मुंडण तथा केशवपन करण्याचे पारंपरिक काम करून कुटुंबाला हातभार लावत आहे. मुंडण झाल्यावर चांगले वयस्कर लोकदेखील दर्शन घेतात. काहीजण म्हणतात, तुझ्या हातात शस्त्र आहे. हे शस्त्र मारण्यासाठी नव्हे; तर तुझ्यापुढे मान झुकवण्यासाठी आहे. अशा प्रतिक्रिया जेव्हा लोक व्यक्त करतात, तेव्हा आपण निवडलेला मार्ग योग्य असल्याची खात्री पटते, असे वैशाली मोरे अभिमानाने सांगतात.
आपले ध्येय साध्य करायचे असेल तर कोणत्याही धंद्याची लाज बाळगायची नाही. हा धंदा पुरुषाचा तो धंदा महिलांचाच का? असा विचार न करता ‘हम भी कुछ कम नही’ हे समाजाला कृतीतून दाखवून द्यावे. माझी पायल हिला न्यायाधीश झालेली मला पाहायचे आहे. सध्या तिची प्रॅक्टिस, परीक्षा व अभ्यास सुरू असून तिलाही जाणीव आहे. - वैशाली मोरे, टीबीके