कालपर्यंत इथेच होता हो, एका रात्रीत चोरीला गेला तो; रस्ता गायब झाल्यानं पोलीस तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:08 PM2021-07-02T15:08:34+5:302021-07-02T15:09:30+5:30
दुर्गम भागातील रस्ता गेला चोरीला; अनोख्या तक्रारीची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा
सिधी: कायद्याचं बोला चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची घटना घडली होती. चित्रपटाचं कथानक चोरीला गेलेल्या विहिरीभोवतीचं फिरत होतं. मात्र मध्य प्रदेशात त्यापुढचा प्रकार घडला आहे. सिधी जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील एक किलोमीटर रस्ता रातोरात गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपसरपंच आणि स्थानिकांनी मनझोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सकाळ होताच रस्ता गायब झाल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात येतं. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
रात्रीच्या सुमारास रस्ता अस्तित्वात होता. मात्र सकाळी तो गायब झाला होता. एक किलोमीटरचा रस्ता गायब झाल्यानं आणि परिसरात मुसळधार होत असल्यानं प्रवास करणं अवघड होत असल्याचं ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितलं. जनपद पंचायत कार्यालयातही स्थानिकांनी तक्रार नोंदवली. हा प्रकार ऐकून अधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला. रस्ता गायब झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याच्या माहितीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.
सिधी जिल्ह्यातील मनझोली जनपद पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मेंध्रा गावात हा प्रकार घडला आहे. हा भाग दुर्गम मानला जातो. मेंध्रा गावातील रस्ता कागदपत्रांवर दिसून येत आहे. या रस्त्यासाठीचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. त्यामुळेच एकाच रात्रीत संपूर्ण रस्ता गायब होऊन आता संपूर्ण परिसरात केवळ खड्डे उरल्याची माहिती स्थानिकांनी दिली.