...म्हणून त्यांनी काढली जिवंत माणसाची अंत्ययात्रा; येणारा-जाणारा प्रत्येकजण पाहतच राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:21 PM2021-06-30T13:21:31+5:302021-06-30T13:23:05+5:30
चक्क जिवंत माणसाची अंत्ययात्रा; ग्रामस्थांचा ढोल-ताशे घेऊन अंत्ययात्रेत सहभाग
मध्य प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अद्याप वरुणराजाचं आगमन झालेलं नाही. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी आता लोकांनी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. धार जिल्ह्यातील लोकांनी पावसासाठी केलेला अजब उपाय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
धार जिल्ह्यातील सरदारपूरमध्ये पाऊस होत नसल्यानं सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी स्थानिकांनी एका जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली. रहिवाशांनी गावात राहणाऱ्या मुकेश भाबर नावाच्या एका तिरडीवर झोपले आणि त्यानंतर अंत्ययात्रा काढली. मुकेश भाबर यांना तिरडीवर ठेवून संपूर्ण परिसरातून त्यांना फिरवून आणण्यात आलं.
मुकेश भाबर यांच्या अंत्ययात्रेत स्थानिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. ढोल-ताशे वाजवत त्यांनी चांगला पाऊस व्हावा यासाठी प्रार्थना केली. गेल्या वर्षीदेखील बरेच दिवस पाऊस झाला नाही, त्यावेळी हा उपाय केला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर चांगला पाऊस झाल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिना संपत आला असतानाही पुरेसा पाऊस न झाल्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून पिकांनादेखील पाणी नसल्याची व्यथा स्थानिकांनी मांडली.