कौतुकास्पद! हिंदू मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आले मुस्लिम बांधव, जवळच्या लोकांनी फिरवली पाठ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:03 PM2021-04-22T15:03:47+5:302021-04-22T15:12:31+5:30
औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला.
(Image Credit : Aajtak)
कोरोना महामारीच्या या काळात जास्तीत जास्त लोक आपापला विचार करताना दिसत आहेत. माणूसकीला लाजवेल अशा घटना समोर येत आहेत. आपलेच लोक आपल्या लोकांपासून दूर पळत आहेत. मृत्युनंतर आपल्याच लोकांना खांदा देण्याचीही परवानगी प्रशासन देत नाहीये. अशा दुर्दैवी परिस्थितीत औरंगाबाद शहरातून मानवतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद शहरात रमजानच्या दिवसात रोजा ठेवणारे मुल्सिम बांधवांनी आपल्या हिंदू मित्राच्या मुलाचा अंत्यसंस्कार पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे केला. या घटनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. खांद्यावर मृतदेह घेणारे दाढी, टोपी आणि रूमाल ठेवलेले हे चेहरे सिनेमातील सीन नाही. औरंगाबादमधील हे सत्य चित्र आहे. औरंगाबादच्या सिटी चौक सराफा भागात राहणारे दलाल हार्डी यांचा मुलगा सुबोध याची ही अंत्ययात्रा आहे. कैलाश नगरच्या स्मशानभूमीत १५ वर्षीय सुबोधला अग्नि देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन केली.
सुबोध हा जन्मताच दिव्यांग होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर अनेक उपचार केले. पण ते मुलाला वाचवू शकले नाहीत. सुबोधच्या मृत्यूची बातमी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना समजली तर त्यांनी सुबोधच्या अंत्यसंस्काराची पूर्ण व्यवस्था केली. इतकेच नाही तर सर्व जबाबदारी त्यांनीच पार पाडली. पूर्ण हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सुबोधला स्मशानभूमीत घेऊन गेले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
भोपाळमध्ये मानवता धर्म बघायला मिळाला
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अशीच स्थिती आहे. येथील दानिश सिद्दीकी आणि सद्दाम कुरेशी सारखे तरूण कोरोनाच्या भीतीला माणूसकीच्या भावनेने मात दिली आहे. भोपाळमध्ये राहणारे दोन्ही मुस्लिम तरूण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मरणाऱ्या हिंदू लोकांच्या मृतदेहांवर अंत्य संस्कार करत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, दानिश आणि सद्दामने आतापर्यंत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या ६० हिंदू लोकांवर अंत्य संस्कार केले आहेत. हे ते लोक आहेत ज्यांच्या घरचे लोक संक्रमणाच्या भीतीने अंत्य संस्कारला येत नाहीयेत किंवा कोरोनाच्या नियमामुळे स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यास पोहोचू शकत नाहीयेत.
दोघेही गेल्या काही दिवसापासून दिवसरात्र हे काम करत आहे. इतकंच काय तर रोजा ठेवला असूनही ते सकाळपासून हॉस्पिटल ते स्मशानभूमीवर फेऱ्या मारत आहेत. ते जाती-धर्म न बघता अंत्य संस्कार करत आहेत. दानिश आणि सद्दाम यांनी हे दाखवून दिलं आहे की, माणूसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नाही.