कोचिंग क्लासमध्ये आत्या-भाच्याचं सूत जुळलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पळून जाऊन लग्न केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:42 PM2022-05-24T16:42:06+5:302022-05-24T16:47:35+5:30
आत्या आणि भाचा एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचे. त्याच वेळी या दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना घडली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. आत्या आणि भाचा एकाच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचे. त्याच वेळी या दोघांमध्ये प्रेम झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या आत्या-भाच्याच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नामुळे कुटुंबासोबतच सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या जोडप्याचा पोलीस ठाण्यातच विवाह झाला. या लग्नामुळे मुलीच्या बाजूचे लोक चांगलेच संतापले आणि त्यांनी मुलीसोबतचं नातं तोडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमध्ये अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. औरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भाच्याचा शेजारी राहणाऱ्या आत्यावर जीव जडला. दोघे कोचिंगमध्ये एकत्र शिकत असताना त्यांच्यात प्रेम झाले. प्रेम पडल्यावर दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. तर दुसरीकडे मुलीच्या वडिलांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर यादोघांनी अचानक औराई पोलीस ठाणे गाठून प्रेम आणि लग्न केल्याचं मान्य केलं आहे.
कपलने अचानक पोलीस ठाणे गाठल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेतले. दोघेही प्रौढ असल्याने पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगितलं, मात्र मुलीकडचे ही गोष्ट मानायला तयार नव्हते. मुलीच्या वडिलांनी मुलीशी संबंध तोडून पोलीस स्टेशन सोडलं. यानंतर पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या उपस्थितीत आत्या-भाच्याचे विधिवत लग्न लावून देण्यात आलं.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सरिता कुमारी अखिलेशची नात्याने आत्या लागत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रेमात नात्याची पर्वा न करता दोघांनी लग्न केलं. 7 दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी अखिलेशवर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता, मात्र आता सरिताने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन लग्न केल्याचं मान्य केलं आहे. मुलीने सांगितले की ती प्रौढ आहे आणि तिच्या इच्छेने लग्न केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.