"सर, 5 डिसेंबरला माझी आई मरणार...", सुट्टीसाठी शिक्षकाने लिहिला अर्ज; नेमकं काय आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 01:12 PM2022-12-05T13:12:38+5:302022-12-05T13:17:59+5:30
सुट्टीचे असे अनेक विचित्र अर्ज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
बिहारमधील शिक्षक सुट्टीसाठी अनोख्या पद्धतीने अर्ज लिहित आहेत. कोणी म्हणतंय की, माझी आई 5 डिसेंबरला मरणार आहे, म्हणून रजा हवी आहे. तर कोणी म्हणतंय की दोन दिवसांनी बाहेर जेवायला जायचं आहे, मग तिथे खाल्ल्याने पोट खराब होईल, म्हणून तीन दिवसांनी सुट्टी हवी. सुट्टीचे असे अनेक विचित्र अर्ज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. भागलपूर, मुंगेर आणि इतर जिल्ह्यांतील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी रजा आणि हजेरीबाबत नवीन आदेश जारी केले आहेत. याला शाळेतील शिक्षकांनी विरोध केला आहे.
विभागीय आदेशानुसार, शिक्षकांना आता प्रासंगिक रजा घेण्यासाठी तीन दिवस अगोदर अर्ज करावा लागणार आहे. या आदेशामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, आपत्कालीन परिस्थितीत प्रासंगिक रजा घेतली जाते. कोणत्याही कर्मचाऱ्याला तीन दिवस अगोदर कसे कळेल की त्याला आपत्कालीन रजेची गरज आहे? याशिवाय शाळेतील शिक्षकांना सकाळी 9.05 पर्यंत सेल्फी क्लिक करून हजेरी लावण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. यालाही विरोध होऊ लागला आहे.
शिक्षकांनी दिला आंदोलनाचा इशारा
विशिष्ट हेतूने शिक्षकांवर अतिरिक्त दबाव टाकल्याचा आरोप होत आहे, तर कुठे त्याविरोधात ई-मेल मोहीम सुरू झाली आहे. बिहार पंचायत-शहर प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष आनंद कौशल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे शिक्षक हे काही भविष्य सांगणारे नाहीत की ज्यांना येणार्या अडचणी लक्षात घेऊन तीन दिवस अगोदर रजेचे अर्ज करावे लागतील.
"मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बेस्ट प्लस एपच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षकांच्या प्रत्यक्ष हजेरीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र विभागीय याला बगल देत शिक्षक मोबाईलवरून सेल्फी क्लिक करून हजेरी नोंदवण्याचा नवा आदेश काढत आहेत. तुघलकी फर्मान काढून शिक्षकांची छळवणूक थांबवली नाही, तर शिक्षक रस्त्यावर उतरतील" असा इशारा त्यांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"