नागली आता झालीय ‘फाइव्ह स्टार’ फूड!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 09:49 AM2022-06-08T09:49:19+5:302022-06-08T09:50:46+5:30

Nagli : ही गोष्ट आहे पश्चिम युगांडातली. त्या देशातल्या बनयोरो आणो बटुरो या समाजात जन्माला आलेल्या बाळाचं बारसं करण्याची एक खास पारंपरिक पद्धत असते.

Nagli is now a 'five star' food! | नागली आता झालीय ‘फाइव्ह स्टार’ फूड!

नागली आता झालीय ‘फाइव्ह स्टार’ फूड!

googlenewsNext

मिलेट्स हा शब्द सध्या फार चर्चेत आहे. मिलेट्स खाणं आहारात कसं आवश्यक आहे, यावर व्हॉट्सॲप ज्ञान देणाऱ्या पोस्ट व्हायरल होतात आणि मग कुणाला प्रश्न पडू शकतो की हे काय नवीन? खरंतर नवीन काहीच नाही, जे आपल्या आहारात पारंपरिक अन्न होतं, जे जगण्याचा भाग होतं ते बाजारपेठीय लाटांमध्ये हरवलं आणि आता पुन्हा तेच परत येऊ लागलं आहे. 

‘इट लोकल’चे नारे देताना भारतातही आपण मिलेट्स अर्थात भरड धान्य हरवून बसलो आहोत. बाजरी, नागली, ज्वारी, वेगवेगळे राळे हे सारे आता दुर्मीळ होऊ लागले आहे आणि जे आपल्याकडे तेच आफ्रिकी देशातही. त्या देशांच्या आहारात झाले बदल, कुपोषणाचे प्रश्न आणि हरवत चाललेले मिलेट्स हे प्रश्न गंभीर आहेत. भविष्यात अतिमहाग म्हणून हे पदार्थ फक्त फाइव्ह स्टार हॉटेलमध्येच मिळतील की काय, अशी शंका आहे. त्यातूनच आता काही चळवळी उभ्या राहत आहेत.

ही गोष्ट आहे पश्चिम युगांडातली. त्या देशातल्या बनयोरो आणो बटुरो या समाजात जन्माला आलेल्या बाळाचं बारसं करण्याची एक खास पारंपरिक पद्धत असते. तिचं नाव आहे ओकुरुका अमाबारा.  जन्माला आलेल्या बाळाच्या बारशासाठी सगळे गावकरी एकत्र जमतात. त्या बाळात कुठले गुण असावेत, याची चर्चा करतात आणि मग ते गुण दर्शवणारं नाव त्याला/ तिला ठेवतात. नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला की त्या बाळाच्या आईवडिलांना शेकोटीवर भाजलेली ताजी नाचणीची भाकरी आणि तुरीचं घट्ट वरण जेवायला वाढतात. त्यांच्या दृष्टीने ताजी नागलीची भाकरी ही नवीन आयुष्याचं प्रतीक आहे. बाळ जन्माला आल्याचा आनंद ते पोेषण यांची गोष्ट सांगणारी ही रीत.

पण आता जागतिक आहार लाटांमध्ये पारंपरिक अन्नच गायब होईल की काय, असं भय तिथंही स्थानिकांना आहेच. संपूर्ण युगांडा देशात ज्वारी, बाजरी, नाचणी अशी तृणधान्य पिढ्यानुपिढ्या लोकांचं प्रमुख अन्न. हीच बाब संपूर्ण आफ्रिका खंडालाही लागू पडते आणि बऱ्याचशा आशिया खंडालाही लागू पडते. युगांडामध्ये पारंपरिकरीत्या प्रत्येक कुटुंब शेती करतं, त्यात तृणधान्य पेरतं आणि कापणीच्या वेळी सगळा समाज, सगळं गाव एकत्र येतं, अशी खरंतर जुनी पद्धत; पण आता तिथंही तुरीचं वरण आणि बाजरी किंवा नाचणीची भाकरी हे आता घराघरातलं पारंपरिक अन्न राहिलेलं नाही आणि त्यामागचं एक मोठं कारण आहे ते म्हणजे पर्यावरणातील बदल.

या तृणधान्यांचं पीक घेणं हे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. वातावरणातील बदलामुळे या पिकाची वाढ पाहिजे तशी होत नाही. त्याचं उत्पन्न अपेक्षेइतकं येत नाही आणि त्यामुळे या प्रकारच्या पिकांखालचं क्षेत्र जगभर आक्रसत चाललं आहे. आत्तापर्यंत टांझानिया देशातील किलीमांजारो पर्वताच्या उतारावर मिलेट प्रकारातील तृणधान्यांची शेतीच प्रामुख्याने केली जायची. मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही. गरिबांचं अन्न समजल्या जाणाऱ्या तृणधान्यांचंच नाही; तर कॉफी आणि ऍव्होकॅडोसारख्या तुलनेने श्रीमंती पदार्थ समजल्या जाणाऱ्या पिकांच्या लागवडीचं क्षेत्रदेखील घटताना दिसत आहे. 

युगांडामध्ये अलीकडे उन्हाळाही फार प्रखर असतो आणि पाऊसदेखील खूप प्रमाणात पडतो. दुष्काळ पडणं आणि पूर येणं, हेही बऱ्यापैकी नित्याचं झालेलं आहे. तृणधान्यांच्या उत्पादनावर या सगळ्याचा अपरिहार्यपणे परिणाम होतो. एकीकडे हे संकट असताना दुसरीकडे अनेक धान्य आणि पिकांच्या लक्षावधी स्थानिक प्रजाती वेगाने नामशेष होत चालल्या आहेत.  या प्रजातींमध्ये ओला आणि कोरडा दुष्काळ सहन करूनही टिकून राहण्याचे गुणधर्म असू शकतात. या वाणांचा अभ्यास करून हे गुणधर्म शेतीयोग्य वाणांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात. मात्र त्यापूर्वीच त्या नामशेष होण्याचं भय आहेच.

सुरण आणि डांगरही  खायला मिळालं नाही तर?
केनियामध्ये तर वेगळंच चित्र आहे. सुरण, रताळी, डांगर (लाल भोपळा) आणि कसावा (ज्यापासून साबुदाणा बनवतात) हे त्यांच्याकडचं पारंपरिक अन्न हळूहळू लोकांच्या आहारातून नाहीसं झालेलं दिसतंय. अशा प्रकारे पारंपरिक अन्न रोजच्या आहारातून नाहीसं 
होण्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा लोकांच्या पोषणावर होतो. विविध प्रकारच्या अन्नातून मिळणारे अन्नघटक न मिळाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं आणि येणाऱ्या पिढ्यांचं हे नुकसान टाळायचं असेल तर नवनवीन पद्धतींचा वापर करून आपल्याला ही विविध तृणधान्य टिकवावीच लागतील; पण टिकणार कसे? हाच तर मोठा प्रश्न आहे.

Web Title: Nagli is now a 'five star' food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न