मंगळावरील दोन वर्षांच्या मोहिमेवर पाठवण्यासाठी नासा शोधत आहे चक्क एक ‘जोकर’, पण का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 06:06 AM2019-02-24T06:06:02+5:302019-02-24T06:06:11+5:30
कठीण समयी टीम राहावी खूश । चांगला वैज्ञानिक, इंजिनीअरही असणे गरजेचे
अंतराळवीर हे सामान्यपणे फार गंभीर किंवा शांत असतात. खरं तर त्यांच्यासाठी गंभीर असणं गरजेचंही आहे. जेणेकरून ते त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष देऊ शकतील. पण नासाची टीम काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे. अंतराळवीरांची एक टीम २०३० मध्ये मंगळ ग्रहावर जाणार आहे. आता अशी माहिती समोर येत आहे की, नासाला या टीममध्ये ‘जोकर’ची भरती करायची आहे.
नासाचं मिशन मार्स साधारण दोन वर्षांसाठी असेल. या मिशनसाठी अशा लोकांचा शोध सुरू आहे जे टीमचा आत्मविश्वास कायम ठेवू शकतील. त्यांना टेन्शन येऊ नये म्हणून गमतीजमती करेल. या जोकरचं नेमकं काय काम असेल, यावर नासा मिशन ग्रुपकडून विचार सुरू आहे.
युनिव्हर्सिटी आॅफ फ्लोरिडामध्ये अँथ्रोपॉलॉजीचे प्राध्यापक जेफरी जॉनसन यांनी सांगितले की, ‘हे लोक कठीण आणि अडचणीच्या काळात पूर्ण टीमला एकत्र ठेवू शकतात. आम्ही अशा व्यक्तीचा शोध घेत आहोत, जो त्याचं काम चांगलं करेल आणि लोकांना हसवत ठेवेल. कारण इतक्या जास्त काळाचं मिशन असल्याने टीममधील लोकांना तणाव येणं सामान्य बाब आहे.’
प्राध्यापक जेफरी म्हणाले की, त्या व्यक्तीला केवळ हसवण्याची कला अवगत असावी, असे नाही. ही व्यक्ती एक चांगली वैज्ञानिक आणि इंजिनीअर असायला हवी. तिला एका ट्रेनिंग प्रोसेसमधूनही जायचं असेल.
प्राध्यापकांनी साऊथ पोलपर्यंत पोहोचणाऱ्या रोआल्ड एमंडसनचा उल्लेख करत सांगितले की, ‘कॅप्टन स्कॉट ज्या कामात अयशस्वी झाले होते, ते काम रोआल्डने यशस्वीपणे केलं. असं झालं कारण त्यांच्या टीममध्ये एक आचारी होता. त्याचं नाव होतं अडॉल्फ लिंडस्ट्रॉम. तो फारच गमती स्वभावाचा होता. तो स्वत:ही आनंदी राहायचा आणि दुसºयांनाही हसवायचा. याने टीमचा आत्मविश्वास नेहमी कायम राहत होता.’