अंतराळात होणार युद्ध! अमेरिकेची संस्था NASA देणार काँटे की ‘टक्कर’; काय आहे मिशन?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:54 AM2021-10-08T05:54:16+5:302021-10-08T05:54:33+5:30
नासाचे अवकाशयान डिमोरफॉस या लघुग्रहावर आदळवले जाणार आहे.
अंतराळात रोज अनेक उलथापालथी घडत असतात. त्या आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. याला कारण पृथ्वीभोवतीचे वातावरण. कधीकधी या वातावरणाचा भेद करून एखादी उल्का पृथ्वीवर आदळते. त्यामुळे एखाद्या भागात हाहा:कार उडतो. पृथ्वीला असलेला हा धोका टाळला जावा आणि पृथ्वीचे संरक्षण व्हावे यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा एक प्रयोग करणार आहे. काय आहे हा प्रयोग, जाणून घेऊ या.
काय आहे मिशन?
नासाने डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट अर्थात ‘मिशन डार्ट’ ही मोहीम आखली आहे. या अंतर्गत एक अवकाशयान तयार केले जात असून ते अंतराळात उल्केवर आदळवले जाईल. २३ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील व्हँडेनबर्ग येथून हे अवकाशयान झेपावेल. अवकाशात स्थिरावल्यानंतर पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये अवकाशयानाची टक्कर घडवून आणली जाणार आहे.
मिशन डार्टचे लक्ष्य?
- नासाचे अवकाशयान डिमोरफॉस या लघुग्रहावर आदळवले जाणार आहे.
- दोन दशकांपूर्वी दिदीमॉस आणि डिमोरफॉस हे दोन पृथ्वीनजीक असलेले लघुग्रह आढळून आले.
- पृथ्वीच्या नजीक असलेल्या या दोन लघुग्रहांपैकी डिमोरफॉसला अवकाशयान टक्कर देणार आहे.
- पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिदीमॉस आणि डिमोरफॉस हे पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. म्हणजेच पृथ्वीपासून त्यांचे अंतर ११ दशलक्ष किमी असेल.
- हे अंतर लक्षात घेऊनच सप्टेंबर, २०२२चा मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
- नासाचे अवकाशयान डिमोरफॉसवर आदळवून त्याची दिशा बदलवली जाणार आहे.
- अनेकदा पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या उल्का पृथ्वीवर आदळण्याचा धोका असतो. धोकादायक उल्का ओळखून त्या पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच नष्ट करता याव्यात, हा उद्देश या मिशनमागे आहे.